निझनी नोव्होगोरोड : बारा वर्षांनंतर प्रथमच इंग्लंडला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सलग दोन विजय नोंदविण्याची संधी आहे. बाद फेरीसाठी जरतरची कोणतीच समीकरणे ठेवण्यास उत्सुक नसलेल्या इंग्लंडला रविवारी दुबळ्या पनामाचा सामना करावा लागणार आहे. मात्र, पनामाही विश्वचषक स्पर्धेतील पहिला गुण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. ही लढत जिंकल्यास इंग्लंडचे बाद फेरीतील स्थान सहज पक्के होणार आहे आणि अखेरच्या साखळी सामन्यात बेल्जियमविरुद्ध गट विजेत्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागेल.

इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन चांगल्या फॉर्मात आहे. टय़ुनिशियाविरुद्ध त्याने महत्त्वपूर्ण गोल केला होता. तसे असले तरी गॅरेथ साउथगेट यांच्या संघाला सलामीच्या लढतीत १७ प्रयत्न करूनही दोनच गोल करता आले होते. भरपाई वेळेत त्यांना विजय खेचून आणण्यात यश आले होते. त्यामुळे या गोष्टींचा विचार केल्यास त्यांना पनामाविरुद्ध खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण पनामाला प्रतिस्पर्धी इंग्लंडची कमकुवत बाजू माहित आहे आणि बचावात्मक खेळ करून इंग्लंडवर दडपण निर्माण करण्याची त्यांची रणनीती असेल. त्यामुळे २००६ नंतर प्रथमच सलग दोन सामने जिंकण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इंग्लंड संघाला पनामाला कमी लेखणे महागात पडू शकते.

सामना क्र. ३०

गट ग

इंग्लंड वि. पनामा

स्थळ : निझ्नी नोव्होगोरोड स्टेडियम

वेळ : सायं. ५:३० वा.