FIFA World Cup 2018 : ‘हे’ ठरले वर्ल्डकपचे ‘हिरो’; जाणून घ्या कोणाला मिळाला कुठला पुरस्कार

FIFA World Cup 2018 FINAL : संपूर्ण स्पर्धेतील विविध आघाड्यांवर यशस्वी ठरलेल्या खेळाडूंना आणि संघांना गौरविण्यात आले.

FIFA World Cup 2018 FINAL : विश्वचषक स्पर्धेत रविवारी फ्रान्सने क्रोएशियाचा पराभव करून जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले. पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या क्रोएशियाचा फ्रान्सने ४-२ असा धुव्वा उडवला. फ्रान्सकडून पूर्वार्धात २ आणि उत्तरार्धात २ असे एकूण ४ गोल केले गेले. क्रोएशियाला मात्र पूर्वार्ध आणि उत्तरार्धात प्रत्येकी १-१ गोल करता आला. एका गोलमध्ये सहाय्य्कची भूमिका बजावणारा आणि एक गोल स्वतःच्या नावे करणारा अँटोइन ग्रीझमन याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

या पुरस्कारा बरोबरच संपूर्ण स्पर्धेतील विविध आघाड्यांवर यशस्वी ठरलेल्या खेळाडूंना आणि संघांनाही गौरविण्यात आले. अंतिम सामना संपल्यानंतर फिफाकडून एका दिमाखदार पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सोहळ्यात या सर्व ‘हिरो’ खेळाडूंना पुरस्काराने गौरविण्यात आले.

१. गोल्डन बॉल : हा पुरस्कार क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रिच याला प्रदान करण्यात आला. फिफाच्या टेक्निकल स्टडी गृपमधील सदस्यांच्या मतांच्या आधारावर सर्वोकृष्ट खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो.

२. सिल्व्हर बॉल : हा पुरस्कार बेल्जियमच्या एडीन हॅजार्ड याला देण्यात आला. सर्वोकृष्ट खेळाडूंच्या यादीतील दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला हा पुरस्कार मिळतो.

३. ब्राँझ बॉल : हा पुरस्कार अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेल्या फ्रान्सच्या अँटोइन ग्रीझमन याला मिळाला. सर्वोकृष्ट खेळाडूंच्या यादीतील तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला हा पुरस्कार मिळतो.

४. गोल्डन बूट : हा पुरस्कार इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याला देण्यात आला. स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक गोल करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो. हॅरी केन याने एकूण ६ सामन्यात सर्वाधिक ६ गोल केले.

५. सिल्व्हर बूट : हा पुरस्कार फ्रान्सच्या अँटोइन ग्रीझमन याला देण्यात आला. स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वैयक्तिक गोल करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो. अँटोइन ग्रीझमन याने स्पर्धेत एकूण ४ गोल केले.

६. ब्राँझ बूट : बेल्जियमच्या रोमेलू लुकाकू याला हा पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वैयक्तिक गोल करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो. रोमेलू लुकाकू याने स्पर्धेत एकूण ४ गोल केले.

७. गोल्डन ग्लोव्हज : हा पुरस्कार थिबॉट कोटरेइस या बेल्जियमच्या गोलकिपरला देण्यात आला. हा पुरस्कारही फिफाच्या टेक्निकल स्टडी गृपमधील सदस्यांच्या मतांच्या आधारावर सर्वोकृष्ट गोलकिपरला देण्यात येतो.

८. सर्वोत्तम युवा खेळाडू : हा पुरस्कार फ्रान्सच्या कालियान एमबापे याला देण्यात आला. २०१८ च्या फिफा विश्वचषकात एमबापेने आपला ठसा उमटवला. फ्रान्सकडून महत्वाच्या सामन्यांमध्ये त्याने गोल केले. अंतिम सामन्यातील त्याचा गोल हा प्रसिद्ध खेळाडू पेले यांच्या विक्रमाची बरोबरी करणारा ठरला.

९. शिस्तबद्ध कामगिरी : स्पेन या फुटबॉल संघाला हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. स्पर्धेतील सर्व सामन्यांत सार्वधिक शिस्त आणि खिलाडूवृत्तीने खेळणाऱ्या संघाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fifa world cup 2018 final fra vs cro france croatia world champion awards