FIFA World Cup 2018 FINAL : फिफा विश्वचषक स्पर्धेत रविवारी फ्रान्सकडून क्रोएशियाला पराभव पत्करावा लागला. पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या क्रोएशियाचा फ्रान्सने ४-२ असा धुव्वा उडवला. फ्रान्सकडून पूर्वार्धात २ आणि उत्तरार्धात २ असे एकूण ४ गोल झाले. क्रोएशियाला मात्र पूर्वार्ध आणि उत्तरार्धात प्रत्येकी १-१ गोलच करता आला. एका गोलमध्ये सहाय्यकाची भूमिका बजावणारा आणि एक गोल स्वतःच्या नावे करणारा अँटोइन ग्रीझमन याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय त्याला स्पर्धेतील आणखी २ पुरस्काराने गौरविण्यात आले.

स्पर्धेतील विविध आघाड्यांवर यशस्वी ठरलेल्या सर्व खेळाडूंना आणि संघांनाही यावेळी फिफाकडून गौरविण्यात आले. अंतिम सामना संपल्यानंतर खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या यादीत ‘गोल्डन बूट’ हा पुरस्कार इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन याला देण्यात आला. स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक गोल करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो. हॅरी केन याने एकूण ६ सामन्यात सर्वाधिक ६ गोल केले. त्यामुळे तो या पुरस्काराचा मानकरी ठरला. या पुरस्कार प्राप्तीमुळे त्याने ३२ वर्षानंतर इंग्लंडला या पुरस्काराचा मान मिळवून दिला. या आधी १९८६ साली गॅरी लिनेकर यांनी गोल्डन बूट पुरस्कार मिळवला होता.

हॅरी केनने स्पर्धेत एकूण ६ सामने खेळले. त्यात त्याने सर्वाधिक ६ गोल कमावले. या ६ पैकी सर्वात जास्त ३ गोल त्याने पनामा संघाविरुद्ध मारले. तो सामना इंग्लंड ६-१ असा जिंकला होता. याशिवाय, ट्युनिशिया संघाविरुद्ध त्याने २ गोल केले, तर राउंड ऑफ १६ मध्ये त्याने कोलंबियाविरुद्ध १ गोल केला.