FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे. काल या स्पर्धेतील सलामीचा सामना रशिया आणि सौदी अरेबिया या दोन संघांमध्ये झाला. या सामन्यात रशियाने सौदी अरेबियाचा ५-० असा दणदणीत पराभव केला. या स्पर्धेच्या विजेत्या संघाला विश्वचषक स्पर्धेची ट्रॉफी मिळणार आहे. मात्र विश्वचषक स्पर्धेची एक ट्रॉफी एकदा चोरी झाली होती आणि ती ट्रॉफी एका श्वानाने शोधून काढली होती. त्याची कहाणीही सामन्यांइतकीच रंजक आहे.

१९६६ साली फुटबॉल विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या विजेत्या संघाला नेहमीप्रमाणे फिफाची विजेतेपदाची ट्रॉफी देण्यात येणार होती. मात्र स्पर्धा सुरु होण्याआधी ही ट्रॉफी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना इंग्लंडमध्ये घडली. चोरीच्या घटनेनंतर लंडन पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र अखेर, ही ट्रॉफी एका श्वानाने शोधून काढली.

चोरीची घटना झाल्यानंतर ही ट्रॉफी ७ दिवसानंतर सापडली होती. पीकल नावाच्या श्वानाने ही ट्रॉफी शोधून काढली होती. एका वर्तमानपत्राच्या कागदात ही ट्रॉफी गुंडाळून ठेवलेल्या अवस्थेत आढळली. पीकल ज्या घरात राहत होता, त्या घराबाजूला असलेल्या घराबाहेर ही ट्रॉफी आढळली. डेव्हिड कॉर्बेट असे पीकलच्या मालकाचे नाव होते. त्याच्या शेजाऱ्याच्या कारजवळ ही ट्रॉफी सापडली होती. मात्र हे सत्र इथेच न थांबता १९८३ साली ब्राझीलमध्ये ही ट्रॉफी पुन्हा चोरी करण्यात आली. त्यानंतर मात्र ती ट्रॉफी अद्याप हस्तगत करण्यात आलेली नाही.

दरम्यान, १९६६ च्या विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंड विजेता ठरला होता. वेस्ट जर्मनी संघाला पराभूत करून त्यांनी हे विजेतेपद पटकावले होते.