पॅरिसच्या विमानतळावर या विश्वविजेत्या संघाचे विमान दाखल होताच, त्या विमानावर चहूबाजूने पाण्याचे उंच फवारे उडवून त्यांच्या स्वागताची सलामी देण्यात आली. त्यानंतर विमानतळावर या खेळाडूंचा जयजयकार करण्यासाठी जमलेल्या हजारो समर्थकांना आवरणे पोलिसांसह अन्य सुरक्षा यंत्रणांना अवघड जात होते. त्या गर्दीतून कसेबसे बाहेर पडलेले खेळाडू ‘चॅम्पियन्स’ नामक सजवलेल्या खुल्या डबलडेकर बसमध्ये उभे राहून प्रेक्षकांकडून मानवंदना स्वीकारू लागले. खेळाडूदेखील प्रेक्षकांकडे बघून हात हलवत तसेच विश्वचषकाचे चुंबन घेत अभिवादन करत असल्याने लाखो नागरिकांना अजूनच उत्साहाचे भरते येत होते. काही खेळाडूंनी तर बसच्या टपावरच ठेका धरत प्रेक्षकांनाही नाचण्यास भाग पाडले. फ्रान्सचा टी शर्ट आणि झेंडा घेऊनच बहुतांश नागरिक या शाही मिरवणुकीत सहभागी झाले होते.
रविवारी फ्रान्सने विजयाकडे वाटचाल सुरू करताच पॅरिसच्या रस्त्यारस्त्यांवर अन् चौका-चौकांमध्ये फ्रेंच गीतांवर फेर धरीत नागरिकांनी विजयोत्सवास प्रारंभ केला. रविवारी सायंकाळपासून सुरू झालेला हा जल्लोष सोमवापर्यंत अव्याहतपणे चालू होता. कुणी कुणाची गळाभेट घेत होते, कुणी उघडय़ा गाडय़ांमधून गाणी गात हिंडत होते तर कुणी रस्त्यांवरून उतरून फ्रान्सचे झेंडे फडकवत जयघोष करीत संघाच्या विश्वविजेतेपदाचा जल्लोष साजरा करीत होते.
कुणी एम्बापेचा फोटो झळकावत होते, तर कुणी ग्रीझमनच्या छायाचित्राला डोक्यावर घेऊन नाचत होते. हे चित्र १० तासांहून अधिक काळ पॅरिसच्या रस्त्यांवर दिसत होते. कुणी फ्रान्सच्या झेंडय़ाच्या रंगाचे फटाके फोडत होते, तर कुणी फ्रान्सचा झेंडा हातात धरून राष्ट्रगीत गात सर्वत्र संचार करीत होते. अशा प्रकारच्या माहोलने संपूर्ण पॅरिस आनंद आणि विजयोत्सवाच्या जल्लोषात न्हाऊन निघाले होते. या विजयाने आमच्यातील एकीमध्ये भर घातली असल्याची भावना अनेक नागरिकांनी बोलून दाखवली. अखेरच्या टप्प्यात पॅरिसच्या जगप्रसिद्ध आयफेल टॉवपर्यंत ही बस गेल्यानंतर प्रचंड जल्लोष आणि नृत्य करीत या शाही मिरवणुकीची सांगता करण्यात आली. दरम्यान रात्री उशीरा राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या अध्यक्षीय प्रासादात खेळाडूंना शाही मेजवानी देण्यात आली. काही ठिकाणी जल्लोष करणाऱ्या युवकांनी अतिरेक करीत रस्त्यांमध्ये श्ॉम्पेनच्या बाटल्या फोडण्यासह अन्य घातक कृत्ये केल्याने बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना अटकाव केला. त्यानंतर पोलिसांवरच ह्ल्ला करणाऱ्या टोळक्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र हे तुरळक प्रकार वगळता फ्रान्सवासीयांनी हा विजय अत्यंत जल्लोषात साजरा केला.