FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी अर्जेंटिना-नायजेरिया यांच्यातील सामना अर्जेंटिनाने जिंकला आणि बाद फेरी गाठली. साखळी फेरीतील पहिल्या दोन सामन्यात आपला ठसा उमटवता न आलेल्या मेसीने तिसऱ्या सामन्यात मात्र १४व्या मिनिटाला गोल केला आणि संघातील आपली उपयुक्तता सिद्ध केली. ‘करो या मरो’च्या लढतीत त्याने गोल केला.

पण, त्या आधीच्या दोनही सामन्यात मेसीला गोल करता आला नाही. आइसलँड या संघाविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला, तर क्रोएशियाने अर्जेन्टिनाला ३-० अशी धूळ चारली. या दोनही सामन्यात अर्जेंटियाला मेसीकडून खूप अपेक्षा होत्या. पण मेसी अपेक्षांचे ओझे पेलू शकला नाही. आइसलँड या संघाने विश्वचषकातील पदार्पणाचा सामना बलाढ्य अर्जेंटीनाशी खेळला आणि बरोबरीत सोडवला. या सामन्यात मेसीने तब्बल ११ वेळा आईसलँडच्या गोल पोस्टवर आक्रमण केले. पण त्याचा एकही हल्ला गोलमध्ये परावर्तित होऊ शकला नाही.

विशेष म्हणजे, या सामन्यात अर्जेन्टिनाला पेनल्टी किकची संधी मिळाली होती. गोल करून सामन्यात आघाडी घेण्याची ही सुवर्णसंधी होती. मेसीने पेनल्टी किकची जबाबदारी स्वीकारली. मात्र, मेसीला ती किक गोलमध्ये परावर्तित करता आली नाही. त्यामुळे मेसीवर प्रचंड टीका झाली. पण कोलकाता पोलिसांनी केवळ टीका केली नाही, तर मेसीची खिल्ली उडवली. ‘तुम्ही वाहतुकीचे नियम पाळा. कारण तुम्ही पेनल्टी मिस (दंड चुकवू) करू शकणार नाही. आम्ही तुम्हाला तसे करूच देणार नाही’, अशा कॅप्शनचा फोटो सीपी कोलकाता यांच्या ट्विटर हॅण्डलवरून टाकण्यात आला आहे.

या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या असून अनेकांनी या फोटोमागील विनोदबुद्धीचे कौतुक केले आहे आणि जनजागृतीच्या या नव्या पद्धतीचे स्वागत केले आहे. मात्र, अर्जेंटिना आणि मेसीच्या चाहत्या वर्गाने या फोटोवरून त्यांना सुनावले. खिलाडूवृत्तीचा हा अपमान असून हा एक ‘लज्जास्पद’ प्रयत्न आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.