
गतउपविजेत्या अर्जेटिनाचे पारडे जड; पदार्पणातच छाप पाडण्यासाठी आइसलँड सज्ज
अर्जेटिनाच्या सराव सत्रात लिओनेल मेसीची एक झलक पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने होणारी गर्दी.. मेसीनामाचा गजर.. कॅमेऱ्याच्या फ्लॅशचा त्याच्यावर होणारा भडिमार.. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी अर्जेटिनाचा संघ रशियात दाखल झाल्यापासून ते आत्तापर्यंतच्या या घडमोडी. मात्र २०१६च्या कोपा अमेरिका स्पर्धेतील पराभवानंतर मेसीने जाहीर केलेल्या तडकाफडकी निवृत्तीची भीती आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे कारकीर्दीतील शेवटच्या विश्वचषक स्पर्धेत मेसीने जेतेपदानेच निरोप घ्यावा, अशी अर्जेटिनाच्या चाहत्यांची इच्छा आहे. या इच्छापूर्तीच्या मोहिमेची सुरुवात शनिवारी आइसलँडविरुद्धच्या लढतीतून होणार आहे. मॉस्कोतील स्पार्टक स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत ‘मेसीमेनिया’ अनुभवायला मिळणार आहे.
कामगिरीतील असातत्य, दुखापती आणि अनेक वादांनंतर रशियासाठी पात्र ठरलेल्या अर्जेटिनाला संभाव्य जेता म्हणून पाहिले जात आहे. मागील अपयश विसरून पुन्हा नव्या दमाने हा संघ जेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज आहे. दोन वेळा (१९७८ व १९८६) जेतेपद पटकावणाऱ्या अर्जेटिनाला ‘ड’ गटातील सलामीच्या लढतीत पदार्पणवीर आइसलँडचा सामना करावा लागणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ३२ देशांमध्ये लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात लहान देश म्हणून आइसलँडची (३ लाख ३५ हजार) ओळख आहे. परंतु त्यांना कमी लेखणे अर्जेटिनासाठी धोकादायक शकते. युरो २०१६ स्पर्धेत आइसलँडने मातब्बरांना धक्का देणाचे सत्र अवलंबवले होते. ख्रिस्तियानो रोनाल्डोसारखा जगातील अव्वल आक्रमकही आइसलँडच्या बचावासमोर हतबल झाला होता.
मेसी, एंजल डी मारिया आणि सर्गियो अॅग्युरो ही अनुभवी आणि आक्रमकांची फौज असूनही अर्जेटिनाला पात्रता स्पर्धेत संघर्ष करावा लागला. पात्रता स्पर्धेतील अखेरच्या लढतीत इक्वेडोरविरुद्ध मेसीने हॅट्ट्रिक नोंदवून अर्जेटिनाला विजयासह रशियाचे तिकीटही मिळवून दिले. युरो स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीनंतर विश्वचषक स्पर्धा ही आइसलँडसाठी मोठी भरारी आहे. पात्रता फेरीत आइसलँडने क्रोएशिया, युक्रेन आणि टर्कीसारख्या आव्हानात्मक संघांचा सामना केला आहे. त्यामुळे मुख्य स्पर्धेत धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे.
युरो स्पर्धेत आइसलँड संघाने कोणत्याही प्रतिस्पर्धीला कडवी झुंज देण्याची क्षमता असल्याचे सिद्ध केले होते. त्यामुळे त्यांना कमी लेखणे चुकीचे ठरेल. – लिओनेल मेसी, अर्जेटिनाचा आक्रमणपटू
- १६ जून २००६ मध्ये लिओनेल मेसीने विश्वचषक स्पर्धेतील पदार्पणाचा सामना खेळला होता. त्या लढतीत अर्जेटिनाने ६-० अशा फरकाने सर्बिया-मोंटेनेग्रो संघावर विजय मिळवला होता. मॅक्सी रॉड्रिगेझ याला बदली खेळाडू म्हणून आलेल्या मेसीने ८८व्या मिनिटाला गोल केला.
- कर्णधार म्हणून विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक ६ गोल करण्याचा विक्रम दिएगो मॅराडोना यांच्या नावावर आहे. लिओनेल मेसीला हा विक्रम मोडण्यासाठी तीन गोलची आवश्यकता आहे.
संभाव्य संघ
अर्जेटिना : विल्फड्रो कॅबेलेरो, एडुडरे सॅलव्हियो, निकोलस ओटामेंडी, मार्कोस टॅग्लिअॅफिको, झेव्हियर मॅस्केरानो, लुकास बिग्लिया, मॅक्सिमिलियानो मेझा, लिओनेल मेसी, एंजल डी मारिया, सर्गिया अॅग्युरो.
आइसलँड : हॅन्नेस हॅल्डरसन, होडरुर मॅग्नसन, रॅगनर सिगर्डसन, कॅरी आर्नसन, बिर्कीर सिव्हार्सन, एमिल हाल्फड्रसन, अॅरोन गुनार्सन, बिर्कीर बिजार्नासोन, गिल्फी सिगर्डसन, जोहान गुडमुंडसन, जोन बोडवार्सन.
रोनाल्डोला आम्ही रोखण्यात यश मिळवले होते, तर मेसीविरोधातही तशीच रणनीती वापरू. तो जगातील सर्वात्तम खेळाडू आहे, परंतु आम्ही विजयासाठी स्वत:ला झोकून देऊ. – जोहान गुडमुंडसन, आइसलँडचा आक्रमणपटू