FIFA World Cup 2018 स्पर्धेला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. पात्र ठरलेल्या जवळपास सर्व देशांचे संघ रशियात दाखल झाले आहेत. तसेच, जगभरातून फुटबॉलप्रेमीदेखील या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी सामन्यांच्या शहरात पोहोचले आहेत. मात्र असे असताना या स्पर्धेला गालबोट लागण्याची शक्यता आहे.

FIFA World Cup 2018 या स्पर्धेसाठी सहाय्यक सामनाधिकारी असलेल्या एका अधिकाऱ्यावर लाचखोरीचा आरोप करण्यात आला आहे. घाना देशातील एका टीव्ही चॅनेलने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मधील व्हिडिओच्या माध्यमातून हा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तो अधिकारी आफ्रिकेतील एका आंतरखंडीय स्पर्धेत ६०० अमेरिकन डॉलर्सची रोख स्वीकारताना दिसत असून तो लाच घेत असल्याचा आरोप या टीव्ही चॅनेलने केला आहे.

एडन रेंज मारवा असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. तो केनियाचा असून त्याला या विश्वचषकासाठी सहाय्यक सामानाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्याची नियुक्ती ‘फिफा’कडून करण्यात आली आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्या अधिकाऱ्याने मात्र आपण विश्वचषकासाठी रशियाला जाणार नसल्याचे ‘फिफा’ला कळवून टाकले आहे.

दरम्यान, या प्रकरणी मारवा आणि इतर संबंधित लोकांबद्दल माहिती घेतली असून त्यांच्याविषयी चौकशी समिती आणि न्यायालयीन समितीकडून अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे ‘फिफा’कडून सांगण्यात आले आहे.