फुटबॉल विश्वात टॅटू काढणे, नाव गोंदवणे आणि खांद्याला किंवा दंडाला काळ्या रंगाची फीत बांधून जवळच्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहणे, या नेहमीच्याच घटना आहेत. मात्र, फ्रान्सचा आघाडीपटू पॉल पोग्बाने आपल्या दिवंगत वडिलांना एक आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण करून चाहत्यांचे मन जिंकले.

गुरुवारपासून सुरू झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सचा पहिला सामना शनिवारी ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात फ्रान्सने २-१ असा विजय मिळवला. फ्रान्सच्या विजयात ८१व्या मिनिटाला गोल करणाऱ्या पोग्बाचे अमूल्य योगदान होते. पंचानी सामना संपल्याची शिटी वाजवताच पोग्बाने आपल्या शिनपॅडमध्ये (फुटबॉल खेळताना गुडघ्याच्या खाली संरक्षण म्हणून घालण्याचे कवच) लपवलेले छायाचित्र आणि संदेश लिहलेली एक चिट्ठी बाहेर काढली. हे छायाचित्र त्याच्या वडिलांचे होते. पोग्बाचे वडील फॅसौ अँटोनी यांचे गेल्यावर्षी वयाच्या ७९व्या वर्षी आजारामुळे निधन झाले. त्यांनीच लिहलेला एक संदेश त्या शिनपॅडवर होता. हे भगवंता, माझ्या ज्ञात-अज्ञात अपराधांबद्दल मला क्षमा कर आणि मला अधिक चांगला माणूस घडव, या आशयाच्या काव्यपंक्तींचा समावेश त्या संदेशात होता. वडिलांच्या निधनानंतर पोग्बाची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. त्याने वडिलांना दिलेल्या या अद्भुत मानवंदनेचे संपूर्ण क्रीडाविश्वातून कौतुक होत आहे.