फुटबॉलचा विश्वचषक म्हटले की, आपल्या नजरेसमोर जगातील विविध देशांचे खेळाडू, त्यांचा गणवेश, खेळत असतानाची व गोल मारल्यानंतरची त्यांची लकब, त्यांच्या केसांच्या स्टाइल, त्यांचे समर्थक, स्पर्धेची तयारी या बाबी दिसून येतात. परंतु या स्पर्धा नियमांचे चाकोरीत शिस्तबद्धरीत्या पार पाडणारा एक घटक या स्पर्धेनिमित्ताने चच्रेपासून बाजूला राहतो. तो म्हणजे सामन्याचे पंच. दिवसेंदिवस फुटबॉल खेळातील नियमांत बदल होत आहेत. चालू विश्वचषक स्पर्धेत व्हिडीओ साहाय्यक सामनाधिकारी तंत्रज्ञानाच्या रूपाने पंचांच्या जबाबदारीत आणखी वाढ झालेली आहे. सामना सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत सामन्यावर पुर्ण नियंत्रण ठेवणे, खेळाडूला सामन्यातील गरवर्तन टाळण्यास भाग पाडणे, सर्व घटकांना खूष ठेवणे हे प्रामुख्याने पंचांचे मुख्य कार्य असते.

चालू विश्वचषक स्पर्धेमध्ये जगातील ३९ देशांतील ३६ मुख्य पंच, ६३ साहाय्यक पंच व नऊ व्हिडीओ साहाय्यक पंच सहभागी झालेले आहेत. या सर्वाचा जगातील सर्वोत्कृष्ट पंच म्हणून फिफाने त्यांचा यादीत समावेश केलेला आहे. २०१४च्या विश्वचषकात रेफ्रींचा हाच आकडा २५ मुख्य व ५२ साहाय्यक पंच इतका होता. आत्तापर्यंतच्या इतिहासात भारताचा एकही पंच विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेला नाही. मात्र युवेना फर्नाडीस ही महिला पंच मात्र २० वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेत साहाय्यक पंच म्हणून सहभागी झालेली आहे. फिफाच्या पंचांच्या यादीत भारताचे १३ पुरुष व तीन महिला पंचांचा समावेश आहे. परंतु फिफाच्या सदर यादीतील भारताच्या एकही पंचाची चालू विश्वचषकामध्ये निवड झालेली नाही. त्याचबरोबर फुटबॉल वर्षभर जेथे मोठय़ा प्रमाणावर खेळला जातो, त्या इंग्लंडचा एकही पंच चालू विश्वचषक स्पर्धेत नाही हे विशेष.

पंचांच्या बाबतीत फिफाकडून अतिशय कडक नियम अवलंबले जातात. एखादा पंच भ्रष्टाचार किंवा मॅच फििक्सग प्रकरणात दोषी आढळला, तर त्याला तात्काळ निलंबित केले जाते. पंचांना फिफाने वयाची अट घातलेली आहे. मुख्य पंचांकरिता २५ ते ३८ वर्षे तर साहाय्यक पंचांकरिता २३ ते ४५ वर्षे वयोमर्यादा आहे. फिफा यादीमध्ये समाविष्ट होण्याकरिता पंच परीक्षा पास होणे आवश्यक आहे. ही परीक्षा पाच स्तरांवर घेतली जाते. कॅट १ ते ५ असे त्याचे स्तर असून कॅट ३ ते ५ हे स्थानिक स्पर्धाकरिता, कॅट २ हा राष्ट्रीय स्पर्धेकरिता तर कॅट १ हा फिफाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता आहे. याकरिता शारीरिक सक्षमता चाचणी तितकीच कडक असते. पहिल्या चाचणीत ४० मीटरच्या सहा िस्पट्र असतात. प्रत्येक िस्पट्रला ६ सेकंद वेळ व मध्ये १ मिनिटाची विश्रांती असते. दुसऱ्या चाचणीमध्ये इंटव्‍‌र्हल टेस्ट घेतली जाते. यामध्ये ४०० मीटरच्या धावण मार्गावर १५ सेकंदांत ७५ मीटर धावणे व १८ सेकंदांत २५ मीटर चालणे असे १० वेळा करावयाचे असते. या परीक्षेत पास न झाल्यास अपात्र  ठरवले जाते. याशिवाय लेखी परीक्षा असते.

व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार केला तर सध्या फुटबॉल पंचांना आर्थिक स्रोतही मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध झालेला आहे. चालू विश्वचषक स्पर्धेत मुख्य पंचांना सत्तर हजार डॉलर मानधन व तीन हजार डॉलर मॅच फी म्हणजेच एकोणपन्नास लाख त्रेपन्न हजार सातशे ऐंशी रुपये मिळणार आहेत, तर साहाय्यक पंचांना पंचवीस हजार डॉलर मानधन व दोनशे डॉलर मॅच फी म्हणजेच सोळा लाख शहान्नव हजार पाचशे रुपये मिळणार आहेत. आजपर्यंत इटलीचे पेअरलुईजी कोलीना हे पंच सर्वात यशस्वी म्हणून ओळखले जातात. ते सध्या फिफा पंच संघटनेचे अध्यक्ष असून त्यांनी १९९१ ते २००५ या काळात ४६० सामन्यात पंच म्हणून काम पाहिले. ते अतिशय कडक पंच म्हणून प्रसिद्ध होते. या काळात त्यांनी १४१३ पिवळे कार्ड तर १३० लाल कार्डे दाखवली. याशिवाय इंग्लंडचे हॉवर्ड वेब्ब व इटलीचेच निकोला रिझोली यांचे नाव यशस्वी पंचांच्या यादीत घेता येईल. सर्वात जास्त काळ पंचांचे काम सार्किस डेमिरडेजेन यांनी वीस वर्षे म्हणजेच १९६२ ते  १९८३ या काळात केले.  सध्या जरी पंचांना मानधन मिळत असले तरी पंचगिरी करताना पंचांना अतिशय परिश्रम घ्यावे लागतात. त्यांचा एखादा निर्णय चुकला तरी सामन्याच्या निकालावर परिणाम होत असतो. म्हणूनच पंचांचे काम हे अतिशय कठीण व जोखमीचे आहे असे म्हणता येईल.

abhijitvanire@yahoo.com