Fifa World Cup 2018 RUS vs RSA : फिफा विश्वचषक स्पर्धेला १४ जूनपासून सुरुवात झाली. यजमान रशियाने सलामीचा सामना जिंकला. त्यांनी Fifa World Cup 2018च्या सलामीच्या सामन्यात सौदी अरेबियाचा ५-० असा धुव्वा उडवला. रशियाच्या युरी गाजिंस्कीने यंदाच्या विश्वचषकातील पहिला गोल केला. या गोलच्या मदतीने त्याने रशियाला सौदी अरेबियाविरोधात १-०ने आघाडी मिळवून दिली. तर त्यानंतर ४३ व्या मिनिटांला डेनिस चेरिशेवने, दुसरा राखीव खेळाडू एरटेम डेज्यूबाने ७१ व्या मिनिटाला आणि त्यानंतर खेळाच्या अखेरच्या काही क्षणांत रशियाने एकामागोमाग एक असे दोन गोल केले आणि सामना ५-० ने जिंकला.

या सामन्यात सौदी अरेबियाला मात्र एकही गोल करता आला नाही. सौदी अरेबियाची बचावाची फळी तर अपयशी ठरलीच. पण त्याबरोबरच त्याची आक्रमणाची फळीही बोथट असल्याचे दिसून आले. हा पराभव संघाच्या व्यवस्थापनाला जिव्हारी लागला आहे. सौदी फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष आदेल एज्जत यांनी संघातील काही खेळाडूंच्या कामगिरीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

यजमान रशियाने निकोप दर्जाचा खेळ खेळून आमच्या संघाला पराभूत केले. पण ते जिंकले, यापेक्षाही आम्ही अतिशय सुमार कामगिरीमुळे पराभूत झालो, या गोष्टीमुळे आम्ही सर्वजण खूपच निराश झालो आहोत. ज्या पद्धतीची तयारी संघातील खेळाडूंनी केली होती, त्या दृष्टीने संघाने लौकिकाला साजेसा खेळ अजिबात केला नाही. त्यामुळे सर्व चाहतेदेखील निराश आहेत, असे त्यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला मुलाखत देताना सांगितले.

या सामन्यात काही खेळाडूंनी अतिशय खराब कामगिरी केली. या कामगिरीमुळे सौदी अरेबियाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे गोलकिपर अब्दुल्ला अल-मायोफ, स्ट्रायकर मोहम्मद अल-सल्वाही आणि डिफेंडर ओमार हवासव्ही या खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे, असे एज्जत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जनरल स्पोर्ट्स ऑथॉरीटीचे अध्यक्ष तुर्की बिन अब्दुलमोहसेन अल-शेख यांनीही ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत तो सामना म्हणजे एक निराशा असल्याचे म्हटले आहे.