फिफा विश्वचषकात यजमान रशियाने बाद फेरीत ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. २०१० साली विश्वचषकाचं विजेतेपद पटकावणाऱ्या स्पेनला रशियाने पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ च्या फरकाने हरवत उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चीत केली. रशियाच्या या विजयाचा हिरो ठरलाय रशियाचा कर्णधार इगोर अकिनफिव्ह….अकिनफिव्हने शूटआऊटदरम्यान कोके आणि अस्फा या दोन स्पॅनिश खेळाडूंची किक थोपवत आपल्या संघाला तब्बल ४८ वर्षांनंतर विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळवून दिलं आहे. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर विश्वचषकाची बाद फेरी गाठण्याची रशियाची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

याआधी इतिहासात १९७० साली सोव्हिएत रशियाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. कालच्या सामन्यात रशियाने घरच्या मैदानावर खेळत असताना धडाकेबाज कामगिरी करत ४८ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. २०१८ सालच्या फिफा विश्वचषकाचा मान रशियाला मिळाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी यशस्वीपणे विश्वचषकाचं आयोजन करुन दाखवलं. मात्र आपला संघ उपांत्यपूर्व फेरी गाठेल असा विश्वास रशियाच्या चाहत्यांना नव्हता. कारण याआधीच्या स्पर्धांमध्ये रशियाच्या संघाची कामगिरी फारशी चांगली नव्हती. मात्र साखळी फेरीत रशियाने लागोपाठ दोन सामने जिंकत बाद फेरी गाठली. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत रशियाचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.