रोमेलू लुकाकूच्या दोन गोलच्या जोरावर बेल्जियमनं नवख्या पनामाचा ३-० असा धुव्वा उडवून फिफा विश्वचषकात विजयी सलामी दिली. या सामन्याच्या पूर्वार्धात पनामानं बेल्जियमला चांगली टक्कर दिली, पण उत्तरार्धात बेल्जियमच्या आक्रमणासमोर पनामानं अक्षरक्ष: गुडघे टेकले. ड्रायस मर्टेन्सनं ४७ व्या मिनिटाला जबरदस्त गोल करुन बेल्जियमला आघाडी मिळवून दिली. मग ६९ व्या मिनिटाला केविन डी ब्र्यूएनाच्या जबरदस्त पासवर रोमेलू लुकाकूनं बेल्जियमसाठी दुसरा गोल डागला. सहा मिनिटांनंतर इडन हझार्डनं दिलेल्या पासवर लुकाकूने पनामाचा गोलकीपर पेनेडोला चकवून बॉल थेट जाळ्यात धाडला आणि बेल्जियमच्या ३-० अशा विजयावर शिक्कामोर्तब केलं. रोमेलू लुकाकूने बेल्जियमसाठी गेल्या १० सामन्यांत तब्बल १५ गोल झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. याचसोबत लुकाकूने आजवर बेल्जियमसाठी ७० सामन्यांत सर्वाधिक ३८ गोल केले आहेत. पनामाचा संघ पहिल्यांदाच विश्वचषकात सहभागी झाला आहे. मात्र पदार्पणातच त्यांना पराभवाची चव चाखावी लागली.