स्वीडनने दक्षिण कोरियावर १-० असा निसटता विजय मिळवून फिफा विश्वचषकात विजयी सलामी दिली. ग्रुप एफच्या या सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं होतं. मग उत्तरार्धात स्वीडनच्या क्लेसनला पेनल्टी बॉक्समध्ये चुकीच्या पद्धतीनं टॅकल करण्यात आलं. यावेळी पेनल्टी द्यायची की नाही याचा निर्णय घेण्यासाठी रेफ्रीनं व्हीएआर अर्थात व्हीडियो असिस्टंट रेफ्रीचा वापर केला. त्यानंतर रेफ्रीनं स्वीडनला पेनल्टी किक बहाल केली. स्वीडनचा कर्णधार आंद्रेस ग्रॅन्कविस्टनं कोणतीही चूक न करता बॉल जाळ्यात धाडला आणि स्वीडनच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. स्वीडननं १९५८ नंतर फिफा विश्वचषकात विजयी सलामी दिली आहे. १९५८ साली स्वीडननं मेक्सिकोला ३-० अशा फरकाने हरवलं होतं. स्वीडनच्या या विजयामुळं ग्रुप एफची लढत आणखी रंगतदार होणार आहे. कारण स्वीडन आणि मेक्सिकोच्या खात्यात प्रत्येकी तीन गुण जमा झाले आहेत. तर गतविजेत्या जर्मनी आणि दक्षिण कोरियाच्या खात्यात भोपळा आहे. त्यामुळे ग्रुप एफमधले आगामी सामने आणखी रंगतदार होतील.