‘It’s coming home’…Football’s coming home’

गेल्या काही दिवसांपासून इंग्लंडमध्ये हे गाणं सर्वांच्याच ओठांवर आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावरही ‘It’s coming home’… Football’s coming home’नं धूमाकुळ घातलाय, आणि याला कारण ठरलाय इंग्लंडचा फुटबॉल संघ. फिफा विश्वचषकात इंग्लंडनं स्वीडनवर विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक मारली. इंग्लंडनं तब्बल २८ वर्षानंतर फिफा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे १९६६ नंतर इंग्लंडला पुन्हा एकदा फिफा विश्वचषक जिंकण्याची संधी चालून आली आहे. आता या संधीचं सोनं करण्यात इंग्लिश खेळाडू यशस्वी होणार का हे आगामी सामन्यात दिसून येईल. पण विश्वचषकाच्या सुरुवातीपासूनच इंग्लिश खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला आहे तो ‘It’s coming home’… Football’s coming home’ या गाण्यानं.

काय आहे ‘It’s coming home’…गाण्याचा इतिहास?

१९६६ साली इंग्लंडमध्ये फिफा विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. इंग्लंडनं त्यावेळी पहिल्यांदाच विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यानंतर बरोबर ३० वर्षांनंतर इंग्लंडला युरो चषकाच्या आयोजनाचा मान मिळाला होता. त्यामुळे डेव्हिड बॅडिएल आणि फ्रँक स्किनर यांच्यासह दी लाईटिंग सीड्स’ या बॅन्डनं ‘It’s coming home’ हे गाणं प्रदर्शित केलं होतं. इंग्लंडमध्ये ३० वर्षांनी एखाद्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि त्यामुळे फुटबॉल पुन्हा एकदा आपल्या घरी परतला या अर्थानं हे गाणं लिहिण्यात आलं होतं, पण इंग्लिश फुटबॉल चाहत्यांनी त्या गाण्याला वेगळाच अर्थ लावला. रशियातल्या विश्वचषकात इंग्लंडच्या चाहत्यांनी जणू हे संघाचं ब्रीदवाक्य असल्याचच ठरवून टाकलंय. यंदाच्या विश्वचषकात इंग्लंडच्या चाहत्यांना आपल्या संघाकडून नेहमीप्रमाणे खूप साऱ्या अपेक्षा आहेत. २०१८ चा विश्वचषक हा इंग्लंडच जिंकणार असा आत्मविश्वास प्रत्येक इंग्लिश चाहत्यामध्ये ठासून भरल्याचं दिसून येतंय. सोशल मीडियावर जर कुणाला इंग्लंडच्या कामगिरीबद्दल विचारलं तर एकच रिप्लाय येतो ‘It’s coming home’…Football’s coming home’, जणू इंग्लंडनं विश्वचषकावर आपलं नाव अगोदरच कोरलं आहे.

फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडसमोर क्रोएशियाचं आव्हान आहे. खरं तर इंग्लंडला आतापर्यंत त्यांच्या तुलनेत दुबळ्या संघांचाच सामना करावा लागला आहे. ट्युनिशिया, पनामा, कोलंबिया, स्वीडनसारख्या संघांना हरवून इंग्लंडनं उपांत्य फेरी गाठली. साखळी फेरीत इंग्लंडला बेल्जियमकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्या तुलनेत क्रोएशियाचा संघ दमदार कामगिरी बजावून इथवर पोहोचला. साखळी फेरीत क्रोएशियानं लायनेल मेसीच्या अर्जेन्टिनाचा ३-० असा धुव्वा उडवला होता. मग बाद फेरीत डेन्मार्क आणि रशियावर मात करुन क्रोएशियानं उपांत्य फेरी गाठली. इंग्लंडकडे जरी संभाव्य विजेता म्हणून पाहिलं जात असलं तरी क्रोएशियासमोर त्यांची खरी कसोटी लागणार आहे.

यंदाच्या विश्वचषकात इंग्लंडला नशिबाचीही तितकीच साथ लाभली. ग्रुप जी मध्ये इंग्लडला बेल्जियमकडून पराभव स्वीकारावा लागल्यानं अंतिम फेरी गाठण्याचा त्यांचा मार्ग सुकर झाला. जर इंग्लडनं बेल्जियमवर विजय मिळवला असता तर त्यांना जपान, ब्राझिल आणि मग फ्रान्ससारख्या तगड्या संघांचा सामना करावा लागला असता. त्यामुळे इंग्लंडने बेल्जियमकडून जाणूनबुजून हार स्वीकारली असंही बोललं जातंय.

गेल्या काही वर्षांमधला इंग्लंडचा यंदाचा संघ हा जबरदस्त असल्याचं दिसतय. त्यामुळे चाहत्यांना या संघाकडून मोठ्या अपेक्षाही आहेत. १९६६ साली इंग्लंडनं विश्वचषक जिंकला होता, त्यावेळी घडलेल्या अनेक घटना ह्या यंदाही घडल्या आहेत. कदाचित हा योगायोगही असू शकतो. पाहूयात काय आहेत त्या घटना.

  • १९६६ साली रियाल माद्रिद युरोपियन चॅम्पियन झाले होते. यंदाही रियाल माद्रिदनं तो मान मिळवला आहे.
  • १९६६ साली मॅनचेस्टर सिटीनं ३ डिव्हीजनपैकी १ इंग्लिश लीग जिंकली होती, तर यंदाही मॅनचेस्टर सिटी इंग्लंडची चॅम्पियन ठरली.
  • १९६६ साली चेल्सी इंग्लिश लीगमध्ये पाचव्या स्थानावर होती. यंदाही चेल्सीला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागंल.
  • १९६६ साली बर्नलीचा संघ युरोपमध्ये खेळण्यास पात्र ठरला होता यंदाही बर्नलीच्या संघानं ती कामगिरी बजावली.
  • १९६६ सालच्या विश्वविजेत्या इंग्लंच्या संघात आर्सेनलचा केवळ एकच खेळाडू होता. यंदाही इंग्लडच्या संघात डॅनी वेलबॅकच्या रुपानं एकमेव आर्सेनल खेळाडू आहे.
  • १९६६ साली सोविएत युनियन म्हणजेच आताची रशियानं विश्वचषकाच्या सुरुवातीचे दोन सामने जिंकले होते. यंदाही रशियानं साखळी फेरीत सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले होते.

असे अनेक योगायोग यंदा जुळून आले आहेत त्यामुळे इंग्लंडचे चाहते ‘It’s coming home’…Football’s coming home’ या गाण्यावर थिरकताना दिसतायत.

इंग्लंच्या संघाची खरी ताकद आहे ते त्यांचं आक्रमण. हॅरी केन, जेसी लिंगार्ड, रहिम स्टर्लिंग, डेली अलीसारखे बिनीचे शिलेदार इंग्लंडच्या संघात आहे. केननं चार सामन्यांत सर्वाधिक सहा गोल झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. पण क्रोएशियाची विदा आणि लोवरेन नावाची भिंत भेदण्याची परिक्षा केनसमोर असेल. क्रोएशियाच्या संघातही दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. मारियो मांझुकीच, लुका मॉड्रिच, इवान राकिटिच, इवान पेरिसिच, रेबिचसारखे रथीमहारथी क्रोएशियाच्या संघात आहे. त्यामुळं फुटबॉलला खरंच आपल्या घरी नेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या इंग्लंडला आधी क्रोएशियाचं कडवं आव्हान मोडून काढावं लागेल.

  • आपल्या प्रतिक्रीया vijay.majha@gmail.com या इमेल आयडीवर कळवा