रशियात सुरु असलेल्या फिफा विश्वचषकात, बाद फेरीमध्ये पहिल्याच दिवशी सलग दुसऱ्या धक्कादायक निकालाची नोंद करण्यात आलेली आहे. ख्रिस्तीआनो रोनाल्डोच्या पोर्तुगालला उरुग्वेने २-१ अशा फरकाने हरवत, विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. या पराभवासोबतच पोर्तुगालचं या विश्वचषकातलं आव्हान आता संपुष्टात आलेलं आहे. शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात फ्रान्सने मेसीच्या अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का दिला होता.


पोर्तुगालचं आक्रमण विरुद्ध उरुग्वेचा भक्कम बचाव अशाच स्वरुपाचा हा सामना रंगलेला पहायला मिळाला. उरुग्वेकडून एडिनसन कवानीने सातव्या मिनीटाला लुईस सुआरेझच्या पासवर गोल करुन आपल्या संघाचं खातं उघडलं. सामन्याच्या सुरुवातीच्या क्षणांमध्येच उरुग्वेकडे १-० अशी आघाडी आल्यामुळे पोर्तुगालचा संघ काहीसा कोलमडला. पहिल्या सत्रात पोर्तुगालच्या खेळाडूंनी उरुग्वेवर अनेक आक्रमण रचली, मात्र त्यांचा बचाव भेदणं पोर्तुगालच्या खेळाडूंना जमलं नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे, उरुग्वेच्या बचावफळीने रोनाल्डोच्या सर्व चालींचा अभ्यास करुन सर्व आक्रमण परतावून लावली.

मध्यांतरापर्यंत उरुग्वेकडे १-० अशी आघाडी कायम होती. दुसऱ्या सत्रात बऱ्याच कालावधीपर्यंत गोलपोस्टवर कोणतीच हालचाल होत नसलेली पाहता, उरुग्वे हा सामना जिंकणार की काय असं वाटत असतानाच पोर्तुगालने सामन्यात बरोबरी साधली. ५५ व्या मिनीटाल फ्रि कीकवर पोर्तुगालच्या पेपेने राफेल गुरेरोच्या पासवर गोल करुन पोर्तुगालला बरोबरी साधून दिली. मात्र त्यांचा हा आनंद फारकाळ टीकला नाही, ६३ व्या मिनीटाला कवानीने सामन्यात दुसरा गोल करत उरुग्वेच्या संघाला पुन्हा आघाडी मिळवून दिली. यानंतर पोर्तुगालने सामन्यात बरोबरी साधण्याचा अथक प्रयत्न केला, मात्र उरुग्वेच्या बचावासमोर त्यांची डाळ शिजू शकली नाही. उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वेसमोर फ्रान्सचं आव्हान असणार आहे.