फिफा विश्वचषक स्पर्धेत परवा झालेल्या सामन्यात स्वीडनने द. कोरियाचा १-० असा पराभव केला. या सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते. मात्र उत्तरार्धात स्वीडनच्या क्लेसनला पेनल्टी बॉक्समध्ये चुकीच्या पद्धतीने टॅकल करण्यात आले. यावेळी पेनल्टी द्यायची की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी रेफ्रीने ‘व्हीएआर’ अर्थात व्हीडियो असिस्टंट रेफ्रीचा वापर केला. त्यानंतर रेफ्रीने स्वीडनला पेनल्टी किक बहाल केली आणि स्वीडनचा कर्णधार आंद्रेस ग्रॅन्कविस्ट याने कोणतीही चूक न करता गोल करत स्वीडनला विजय मिळवून दिला.

या सामन्यात स्वीडनने जरी विजय मिळवला असला, तरी द. कोरियाने सामना जिंकण्यासाठी किंवा बरोबरीत रोखण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांच्या बचावाच्या फळीने पूर्वार्धात आपली जबाबदारी चोख पार पाडली. पण उत्तरार्धात मात्र त्यांच्या आक्रमणाच्या फळीकडून झालेल्या चूकीमुळे हा सामना त्यांना गमावावा लागला आणि त्यांनी आखलेली एक योजना फसली.

द. कोरियाची या सामन्यासाठी केलेली आणि फसलेली ही दुसरी योजना होती. केवळ सामन्याच्या वेळीच नव्हे, तर या सामन्याआधी सराव सत्रातही द. कोरियाने स्वीडनच्या संघाला गंडवण्यासाठी एक योजना आखली होती. द. कोरियाचा संघ ज्यावेळी सराव करत होता, त्यावेळी त्यांचा सराव आणि त्यांच्या खेळाडूंचा अभ्यास करण्यासाठी स्वीडनतर्फे एक स्पाय (हेर) या सरावाच्या ठिकाणाच्या आसपास होता, असे सूत्रांकडून सांगण्यात येत होते. याबाबत आम्हालाही समजले होते. त्यामुळे आम्ही सराव करताना काही खेळाडूंच्या जर्सींची आदलाबदली केली, असे द. कोरियाचे प्रशिक्षक शीन ते-याँग यांनी सांगितले.

या जर्सींची आदलाबदली करण्याच्या कल्पनेमागील कारण सांगताना ते म्हणाले की पाश्चिमात्य देशांतील लोकांना आशियाई उपखंडातील लोकांची चेहरापट्टी (फेसकट) ही एकसारखीच वाटते. त्यामुळे स्वीडनचा जर कोणी आमच्या खेळाडूंचा सराव पाहत असेल, तर त्याला गंडवण्यासाठी हे केले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.