FIFA World Cup 2018 : हे आहेत विश्वचषक खेळणारे सर्वात छोटे देश

विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र ठरणे, हे अनेक छोट्या-मोठ्या संघांचे स्वप्न असते.

आइसलँडचा संघ FIFA World Cup 2018साठी पात्र ठरला आहे.

फिफा विश्वचषक स्पर्धा ही फुटबॉल चाहत्यांसाठी एक पर्वणी असते. जगभरातील सर्वोत्तम संघ आणि सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेत चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडतात. विविध विक्रम प्रस्थापित होतात आणि काही विक्रम मोडीत काढले जातात. या विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र ठरणे, हे अनेक छोट्या-मोठ्या संघांचे स्वप्न असते. मोठे किंवा प्रगत देशच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात असे नाही, तर छोटे, कमी लोकसंख्या असलेले देशही आपल्या गुणवत्तेनुसार या स्पर्धेसाठी मोठ्या देशांबरोबर स्थान मिळवतात. त्यापैकी हे आहेत कमी लोकसंख्या असलेले देशातील ५ छोटे देश.

१. आइसलँड

आइसलँड

 

आइसलँड हा देश FIFA World Cup 2018साठी प्रथमच पात्र ठरला आहे. महत्वाचे म्हणजे ही कामगिरी करणारा आइसलँड हा जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश ठरला आहे. या देशाची लोकसंख्या केवळ ३ लाख ३५ हजार इतकीच आहे. युरोपियन गटातून हा देश अव्वल आला असून विश्वचषकसाठी पात्र ठरला. या गटात क्रोएशिया, टर्की, युक्रेन आणि फिनलँड असे तोडीचे संघ होते.

२. त्रिनिदाद आणि तोबॅगो

त्रिनिदाद आणि तोबॅगो

 

त्रिनिदाद आणि तोबॅगो हा देश FIFA World Cup मध्ये २००६ साली बलाढ्य जर्मनीला पराभूत करून स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. विश्वचषक स्पर्धेत खेळलेला हा लोकसंख्येनुसार दुसऱ्या क्रमांकाचा छोटा देश आहे. त्रिनिदाद आणि तोबॅगो हा कॅरेबियन बेटांमधील एक देश असून या देशाची लोकसंख्या केवळ १.३ मिलियन इतकीच आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व विश्वचषक स्पर्धांमध्ये अजूनही त्रिनिदाद आणि तोबॅगो हा सर्वात कमी लोकसंख्येचा देश आहे. मात्र यंदाच्या स्पर्धेत आइसलँड त्यांचा हा विक्रम मोडणार आहे. त्रिनिदाद आणि तोबॅगो या देशाने २००६ साली पात्रता फेरी गाठून सापर्डेत प्रवेश तर मिळवला होता, मात्र त्यांची कामगिरी खूपच निराशाजनक झाली होती. त्यांनी साखळी फेरीत पहिला सामना स्वीडनशी ० – ० असा बरोबरीत सोडवला होता. तर पुढील दोन सामने हारले होते. त्रिनिदाद आणि तोबॅगो संघाने अद्यापही विश्वचषक स्पर्धेत गोल मारलेला नाही.

३. नॉर्दन आयर्लंड

नॉर्दन आयर्लंड

 

FIFA World Cup स्पर्धेत नॉर्दन आयर्लंड देशाने अनेक चांगले आणि प्रतिभावान फुटबॉलपटू दिले. परंतु असे असूनही नॉर्दन आयर्लंड हा स्पर्धेत सहभागी होणारा पाच छोट्या लोकसंख्येच्या देशांपैकी एक आहे. या देशाची लोकसंख्या १.८ मिलियन इतकी आहे. नॉर्दन आयर्लंड संघ आतापर्यंत एकूण ३ वेळा या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. सर्वप्रथम १९५८ मध्ये त्यांना विश्वचषक स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली होती आणि त्यांनी उप-उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. पण फ्रान्सने त्यांना पराभूत केले. त्यांनतर १९८२ साली दुसऱ्यांदा नॉर्दन आयर्लंड देशाने विश्वचषक खेळला. त्यावेळी त्यांनी साखळी फेरीत गटात अव्वल स्थान राखले. मात्र दुसऱ्या फेरीत पुन्हा फ्रान्सने त्यांना पराभूत केले. त्यानंतर लगेचच पुढच्याच (१९८६) विश्वचषकात त्यांना पुन्हा संधी मिळाली पण त्यावेळी मात्र ते साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर झाले.

४. स्लोव्हेनिया

स्लोव्हेनिया

 

या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेला देश म्हणजे स्लोव्हेनिया. या देशाची लोकसंख्या केवळ २ मिलियन इतकी आहे. २००२ साली त्यांनी पात्रता फेरी पार करून विश्वचषक स्पर्धा गाठली होती. मात्र त्या स्पर्धेत ते तक्त्याच्या टाळला राहिले. २०१० साली ते पुन्हा स्पर्धेसाठी पात्र ठरले. यावेळी त्यांनी आधीपेक्षा चांगली कामगिरी केली. या स्पर्धेत त्यांनी स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. अल्जेरियाला त्यांनी १-०ने पराभूत केले. मात्र त्यांनतर ‘अंतिम १६’च्या फेरीत त्यांना स्पर्धेबाहेर व्हावे लागले होते.

५. कुवेत

कुवेत

 

कुवेत हा मध्य पूर्वेतील देश पहिल्यांदा १९८२ साली विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला. या देशाची लोकसंख्या ही सुमारे ४०.५ लाख इतकीच आहे. या स्पर्धेत त्यांना फ्रान्स, इंग्लंड आणि झेकोस्लोव्हाकिया या बलाढ्य गटात टाकण्यात आले. झेकोस्लोव्हाकियाशी झालेला सामना कुवेतने १-१ असा बरोबरीत सोडवला. पण इतर दोन संघांपुढे त्यांचा निभाव लागला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fifa world cup 2018 top 5 small countries population