मॉस्को : वीस वर्षांपूर्वी फ्रान्सने मिळवलेल्या विजयाच्या माझ्या स्मृती या विजयामुळे ताज्या झाल्या आहेत. तो विजय तर फ्रान्समध्ये मिळवलेला असल्याने तिथेदेखील असाच जल्लोष झाला होता. त्या संघात एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून असल्याने त्याच्या स्मृती तर माझ्या मनात चिरंतन राहणारच आहेत. मात्र हा विजयदेखील त्या विजयाइतकाच मोठा आणि अफलातून असल्याचे मत प्रशिक्षक दिदिएर देशॉँ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

मैदानावरील पुरस्कार सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर भावना प्रकट करताना देशॉँ म्हणाले, ‘‘आता जी मुले १०, १५, २० अशा वयोगटांत आहेत, त्यांच्यासाठी हा विजय म्हणजे त्यांच्या आयुष्यभराची आनंदमयी स्मृती आहे. तसेच जे २३ खेळाडू संघातून खेळले ते एकमेकांशी बांधले गेले असून त्यांच्यासाठी हा आयुष्यभराचा ठेवा आहे. विश्वविजेत्या संघाचा घटक असणे यापेक्षा जगात काहीच मोठे नसते.’’

‘‘२०१६ साली युरो चषकाच्या अंतिम सामन्यात आम्हाला पोर्तुगालकडून पराभव पत्करावा लागला. मात्र कदाचित युरो जिंकला असता तर विश्वचषक जिंकू शकलो नसतो असेही वाटत आहे,’’ असे  देशॉँ म्हणाले.

‘‘अर्जेटिनावर ४-३ ने मिळवलेला विजय आणि त्यात एम्बापेने केलेले अफलातून गोल यामुळे संघाच्या वाटचालीला गतीसह आत्मविश्वासाचे कवच लाभले. त्यानंतर उरुग्वे आणि बेल्जियमवरील विजय आमच्यासाठी सर्वाधिक मोलाचा ठरला. तिथून आम्ही विश्वविजेते बनण्याच्या आशा बळावल्या,’’ असे देशॉँ यांनी सांगितले.

..अन देशॉँना घातले वारुणीने स्नान

फ्रान्सने दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर मैदानावर तासभर विजयी जल्लोष साजरा केला. त्यानंतर प्रशिक्षक दिदिएर देशॉँ हे प्रसारमाध्यमांना संबोधित करण्याकरिता मॉस्कोतील लुझ्निकी स्टेडियमच्या पत्रकारपरिषदेच्या दालनात बसले. अन् तेवढय़ात पुन्हा सगळे खेळाडू अचानकपणे त्या दालनात घुसले आणि त्यांनी देशॉँ यांना श्ॉम्पेनसह विविध प्रकारच्या वारुणींनी सचैल स्नान घालत प्रशिक्षकांप्रति असलेला त्यांचा जिव्हाळा अधोरेखित केला. खेळाडूंनी त्या दालनातच नाचायला आणि प्रशिक्षकांवर श्ॉम्पेनच्या धारांचा मारा करत जल्लोष केला. बचावपटू बेंजामिन मेंडी याने या धांगडधिंग्यात खेळाडूंमध्ये सर्वाधिक पुढाकार घेतला होता. त्याने तर अंगावरचा शर्टदेखील भिरकावून देत नाच करत विजयोत्सवात रंग भरले. ड्रेसिंगरूममध्येदेखील असाच विजयोत्सव साजरा करण्यात आला.