ऋषिकेश बामणे

खेळाडूंकडून चुकीने होणारे स्वयंगोल, बलाढय़ संघाना साखळी फेरीतच बसलेले हादरे आणि साखळी गटातच स्पर्धेच्या बाहेर फेकले जाण्याचे त्यांच्यावर फिरणारे सावट यांसारख्या अनेक कारणांमुळे रशियात सुरू असलेली विश्वचषक फुटबॉल स्पर्धा ऐतिहासिक ठरत आहे. २० जूनचा दिवसही अशाच प्रकारे संस्मरणीय होता. इंग्लंडची विकी स्पार्क्‍स हिने विश्वचषकाच्या इतिहासातील पहिली महिला समालोचक होण्याचा मान मिळवला. विकीच्या याच अभूतपूर्व प्रवासावर टाकलेला हा दृष्टिक्षेप. सोबत आणखी काही रंजक घडामोडींचा आढावा.

बुधवारी झालेल्या पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को यांच्यातील सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या (बीबीसी) वाहिनीवर अचानक एका महिलेचा आवाज ऐकू आला. विश्वचषक फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी महिला चक्क फुटबॉल सामन्याचे थेट समालोचन करत असल्यामुळे सर्वाचे लक्ष आपोआपच त्या आवाजाकडे वेधले गेले. विकी स्पार्क्‍स नावाच्या गोड मुलीचा तो आवाज होता.

मॉस्कोच्या लुझ्निकी स्टेडियमवर झालेल्या पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्कोच्या सामन्यात समालोचन कक्ष २६९ मध्ये विकी बसली होती. ख्रिस्तियानो रोनाल्डोने जेव्हा गोल केला त्या वेळी लगेचच विकीने रोनाल्डोपेक्षा एकाही युरोपियन खेळाडूने इतके गोल केले नसल्याची माहिती त्वरित सांगितली. दोन्ही संघाच्या खेळाडूंचा तिने योग्य अभ्यास केला होता, हे तिच्या बोलण्यातून दिसून येत होते. २०१४ पासून विकी बीबीसीसाठी कार्यरत असून त्यापूर्वी तिने एफए महिलांच्या फुटबॉल लीगसाठी समालोचन केले होते. याव्यतिरिक्त तिने फायनल स्कोर आणि बीबीसी रेडिओ फाईव या वाहिन्यांसाठी देखील समालोचनाचे काम केले आहे.

बालपणापासूनच फु टबॉलची ओढ

इंग्लंडमधील न्यू कॅसल शहरात जन्मलेल्या विकीला लहानपणापासूनच फुटबॉलचे सामने पाहण्याची आवड होती. विशेष म्हणजे घरात दूरचित्रवाणीवर फुटबॉलचा एखादा सामना सुरू असताना मनोरंजन म्हणून विकी समालोचनाचा आवाज पूर्ण बंद करून स्वत:च समालोचक व्हायची. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणेच विकीचीही कारकीर्द पत्रकारितेत घडणार याची चिन्हे तेव्हाच दिसू लागली.

विकीची चर्चा जगभर

मार्च २०१७ मध्ये बर्नलेविरुद्धच्या सामन्यात ०-० अशी बरोबरी साधल्यानंतर सदरलँड क्लबचे प्रशिक्षक डेव्हिड मोयेस यांना विचारलेल्या एका प्रश्नामुळे विकी जास्त चर्चेत आली. ‘‘तू शेवटी फार मूर्खासारखी वागत होतीस, म्हणून जरा काय बोलते आहेस याकडे लक्ष दे. तू महिला असलीस तरीही तुला कोणीही एक चपराक देऊ  शकते. त्यामुळे पुढे या गोष्टीची जाणीव ठेव,’’ अशा शब्दात त्यांनी विकीला सुनावले. मात्र, फुटबॉल संघटनेने डेव्हिड यांना ३० हजार डॉलर इतका दंड ठोठावला व विकीची माफीही मागण्यास सांगितले.

विकीपूर्वी कोण?

विकीच्या आधी तब्बल ११ वर्षांपूर्वी इंग्लंडच्याच जॅक्की ओटलीने प्रथमच एका फुटबॉल सामन्यासाठी थेट समालोचन केले होते. तसेच जॅक्की यांनी २०१६च्या युरो स्पर्धेतसुद्धा समालोचकाची भूमिका पार पाडली आहे. यंदाच्या विश्वचषकात त्या बीबीसीच्या क्रीडा विभागाचे कामकाज हाताळणार आहेत. विकी जेव्हा समालोचन करण्यासाठी आली, तेव्हा समाज माध्यमांवर तिच्याविरोधातही प्रतिक्रिया उमटल्या. महिलांना सामन्याचे थेट समालोचन करणे अवघड आहे, त्यांनी या क्षेत्राकडे वळूच नये अशा प्रतिक्रियाही काहींनी ट्विटरवर लिहिल्या.

नोस्त्रो फोझ – संपूर्ण जगात फक्त कुत्रेच सध्या विकीचे समालोचन ऐकत आहेत.

नॅनी गोट – फुटबॉलमध्ये महिला समालोचकांची काय गरज आहे? कोणीतरी विकीला सांगा, की ती फार मेहनत घेत आहे. आम्हाला फुटबॉलचे समालोचन पुरुषांच्याच आवाजात ऐकायला आवडते.

rushikesh.bamne@expressindia.com