मुंबईत जोरदार पाऊस पडत असताना रशियात सुरु असलेल्या विश्वचषकात आज इंग्लंडनं गोलचा अक्षरश: पाऊस पाडला. हॅरी केनच्या हॅटट्रिकच्या जोरावर इंग्लंडनं पनामाचा ६-१ असा धुव्वा उडवून फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक मारली. विश्वचषकात इंग्लंडचा हा सलग दुसरा विजय ठरला. या सामन्यात इंग्लंडनं अगदी पहिल्या मिनिटापासून निर्विवाद वर्चस्व गाजवलं.

जॉन स्टोन्सनं आठव्या मिनिटाला गोल करुन इंग्लंडचं खातं उघडलं. मग हॅरी केनने २२ व्या मिनिटाला पेनल्टी किकवर गोल झळकावला. जेसी लिंगार्डने ३६ व्या मिनिटाला गोल करुन इंग्लंडची आघाडी ३-० अशी वाढवली. यापाठोपाठ जॉन स्टोन्सने पुन्हा एकदा ४० व्या मिनिटाला गोल करुन सामन्यातला आपला दुसरा गोल केला. सहा मिनिटांनी हॅरी केननं पुन्हा एकदा पेनल्टी किकवर गोल डागला. त्यामुळं इंग्लंडला पूर्वार्धात ५-० अशी भक्कम आघाडी घेता आली. विश्वचषकाच्या एखाद्या सामन्यात पूर्वार्धात ५-० अशी आघाडी घेण्याची ही आजवरची पाचवी वेळ ठरली.

या सामन्यात उत्तरार्धात हॅरी केनने ६२ व्या मिनिटाला गोल झळकावून आपली हॅटट्रिक साजरी केली. फिफा विश्वचषकात हॅटट्रिक झळकावणारा हॅरी केन हा इंग्लंडचा आजवरचा तिसराच खेळाडू ठरला. याआधी १९६६ सालच्या विश्वचषकात जेफ हर्स्ट यांनी जर्मनीविरुद्ध अंतिम सामन्यात, तर १९८६ साली गॅरी लिनेकर यांनी पोलंडविरुद्ध सामन्यात हॅटट्रिक डागली होती. पनामासाठी या सामन्यात फेलिप बलोयनं एकमेव गोल केला. पण हा गोल पनामासाठी ऐतिहासिक ठरला. कारण पनामाचा फिफा विश्वचषकातला हा पहिलावहिला गोल ठरला. दरम्यान हॅरी केन हा गोल्डन बूटच्या शर्यतीत ५ गोलसह सध्या आघाडीवर आहे. तर ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि रोमेलू लुकाकूच्या खात्यात प्रत्येकी ४-४ गोल जमा आहेत.