फिफा २०१८ स्पर्धा १४ जूनपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत दिग्ग्ज संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक फुटबॉल विश्वचषकाप्रमाणे यंदाच्या स्पर्धेतही गोलचा पाऊस पडणार हे नक्की. अनेकदा पहिल्या मिनिटांपासून ते अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत सामन्यात गोलची माळ पाहायला मिळते. मात्र, काही सामन्यांमध्ये गोलही होत नाही, त्यामुळे सामने शून्याच्या बरोबरीत सुटतात. तर काही स्पर्धा किंवा सामने असेही असतात, त्यात केवळ १ किंवा २ गोल केले जातात आणि तेच निर्णायक ठरतात.

अशीच घटना २०१० च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत झाली. या विश्वचषकात नेदरलॅंड्स विरुद्ध स्पेन असा अंतिम सामना रंगला. या सामन्यामध्ये केवळ १ गोल झाला आणि स्पेनने हा सामना जिंकला. परंतु हे तितकेसे नवीन नव्हते. या स्पर्धेतील अचंबित करणारी गोष्ट म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत स्पेनच्या संघाने केवळ ८ गोल कमावले आणि तरीही या संघाने विश्वचषकावर आपले कोरले. मुख्य म्हणजे, एखाद्या विश्वचषक स्पर्धेत विजेत्या संघाने केलेले हे सर्वात कमी गोल ठरले.

 

२०१० फिफा विश्वचषक स्पर्धेचा विजेता – स्पेन

 

२०१०च्या संपूर्ण स्पर्धेत स्पेनने केवळ ८ गोल केले आणि त्या बळावर स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. स्पेनने साखळी फेरीच्या तीन सामन्यात मिळून एकूण ४ गोल केले होते आणि त्यानंतर झालेल्या बाद फेरीच्या सामन्यात अंतिम सामना धरून स्पेनने चार गोल केले. त्यातील अंतिम सामना त्यांनी १-० असा जिंकला. याशिवाय, विश्वचषक स्पर्धेचा सलामीचा सामना पराभूत झाल्यानंतर स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरणारा स्पेन हा पहिला संघ ठरला होता.