FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियावर ४-२ असा विजय मिळवून २० वर्षानंतर जगज्जेतेपदाचा बहुमान पटकावला. फ्रान्सने पूर्वार्धात २ आणि उत्तरार्धात २ असे एकूण ४ गोल केले. तर क्रोएशियाने पूर्वार्ध आणि उत्तरार्धात प्रत्येकी १-१ गोल केला. विशेष म्हणजे सामन्यात चेंडूचा ६१ टक्के ताबा क्रोएशियाकडे असूनही त्यांना हार पत्करावी लागली.

१९९८ साली झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत देशॉ हे फ्रान्सच्या संघात होते. तर आज झालेल्या सामन्यात ते फ्रान्सचे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. यापूर्वी ब्राझिलचे मारियो झगालो आणि जर्मनीचे फ्रांज बेकनबॉयर यांनीही अशी कामगिरी केली आहे. देशॉ यांच्या या कामगिरीबाबद्दल फ्रान्सच्या भुयारी रेल्वेच्या एका स्थानकाला दिदिएर देशॉ यांचे नाव देण्यात येणार आहे. याशिवाय, फ्रान्स संघाचा कर्णधार आणि गोलकिपर ह्युगो लॉरीस याचेही नाव एका रेल्वे स्थानकाला देण्यात येणार आहे.

सध्या पॅरिसमध्ये असलेले नॉटर-डेम-देशॉ या स्थानकाला दिदिएर देशॉ हे नाव देण्यात येणार आहे. तर कवी व्हिक्टर ह्युगो यांच्या नावाने असलेल्या स्थानकाला आता व्हिक्टर ह्युगो लॉरीस असे नाव देण्यात येणार आहे.

फ्रान्सने सामना जिंकल्यानंतर फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर देशॉ यांच्या नावावर प्रशिक्षक म्हणून एक जगज्जेतेपद नोंदवण्यात आले. याच विजेतेपदामुळे त्यांच्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित झाला. संघातील खेळाडू म्हणून आणि संघाचा प्रशिक्षक म्हणून संघाला विश्वचषक जिंकवून देणारे देशॉ हे फुटबॉल जगतातील तिसरी व्यक्ती ठरले.