08 April 2020

News Flash

फ्रेंच क्लासिकल मेन्यू

परकीय जेवण पद्धतीची माहिती नसली की गोंधळ कसा होऊ शकतो हे आपण मागच्या सदरात पाहिलं.

कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी वापरावी? चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटीकेट सांगणारं सदर. आजच्या लेखात फ्रेंच क्लासिकल मेन्यूच्या प्रकाराविषयी आणि त्यांच्या
१७ कोर्स जेवणाविषयी..

परकीय जेवण पद्धतीची माहिती नसली की गोंधळ कसा होऊ शकतो हे आपण मागच्या सदरात पाहिलं. तेव्हा, निरनिराळ्या जेवण पद्धतींबद्दल आपण जाणून घेऊ या. आपल्याकडे सर्वात प्रचलित परकीय जेवण पद्धत ही, इंग्रजांच्या वारशाने आलेली पाश्चात्त्य जेवण पद्धत आहे.
पाश्चात्त्य जेवण पद्धतीचा उगम हा फ्रेंच जेवणातून झाला असून, फ्रेंच लोकांनी तो अगदी काळजीपूर्वक जोपासला आहे. आजही फ्रान्समध्ये ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ मानलं जातं आणि नामांकित शेफ्सना सेलेब्रिटी स्टेटस असत. राजेशाहीचा आश्रय (patronage) मिळाल्याने, उत्तम पदार्थ आणि ते बनविण्यास अतिशय कुशल असे स्वयंपाकी (शेफ्स) तयार झाले. आपल्या सर्वाच्या परिचयाचा ‘मेन्यू’ हा शब्दही फ्रेंचच आहे. इंग्रज त्याला पूर्वी ‘बिल ऑफ फेर’ (bill of fare) म्हणायचे. मेन्यू म्हणजे स्वयंपाकघरात/किचनमध्ये तयार होणाऱ्या पदार्थाची यादी! त्या यादीवरून आपल्याला काय खायचं आहे हे ठरविता येतं. मेन्यू हा मुख्यत: दोन प्रकारचा असतो – ‘आ ला कार्ट’ (म्हणजेच मेन्यू कार्डमधून आपल्याला पाहिजे ते पदार्थ ऑर्डर करणे) आणि ‘ताब्ल दोत’ (table of the host – जे स्वयंपाकघरात बनविलं आहे तेच सव्‍‌र्ह केलं जातं ); याला ‘सेट’ किंवा ‘फिक्स्ड प्राइस्ड’ असंही म्हणतात.
‘आ ला कार्ट’मध्ये प्रत्येक पदार्थ वेगळा ऑर्डर केला जातो. तो पदार्थ संपूर्णरीत्या तयार नसल्याने तो बनविण्यासाठी थोडा अवधी द्यावा लागतो. आपल्या चवीनुसार पदार्थ बनविता येतात. म्हणजे तिखट कमी-जास्त, मीठ, साखर हवं- नको, जास्त खरपूस हवं.
इत्यादी. म्हणूनच भोजन करणाऱ्याला ऑर्डर दिल्यानंतर पदार्थाची थोडी वाट पाहावी लागते. आपण जेवढं ऑर्डर करतो तेवढय़ाचेच पैसे आकारले जातात. हा प्रकार आपल्याकडे जास्त प्रचलित आहे.
‘फिक्स्ड प्राइस्ड’ पद्धतीत जेवणातले पदार्थ जवळजवळ तयारच असतात. यात साधारणत: पाश्चात्त्य जेवणात, तीन ते चार पदार्थाचा (कोर्सेसचा) समावेश असतो. एकदा का ‘फिक्स्ड प्राइस्ड’ मेन्यू ऑर्डर केला की, त्या संपूर्ण जेवणाची किंमत आकारली जाते. मग त्यातले काही पदार्थ तुम्ही खाल्ले नसले तरी. हे काहीसं आपल्याकडल्या थाळीसारखं आहे.
पाश्चात्त्य जेवण हे कोर्सेसमध्ये घेतलं जातं. परंपरेनुसार ‘फ्रेंच क्लासिकल मेन्यू’मध्ये १७ कोर्सेस असतात. त्यात स्टार्टर, सूप, पास्ता, फिश, ऑन्त्रे (entree  – मांसाहारी मेन डिश, अनेकातली पहिली असं म्हणता येईल), डिझर्ट, चीज इत्यादींचा समावेश असतो. प्रत्येक पदार्थ हा एक कोर्स म्हणून खाल्ला जातो आणि प्रत्येक कोर्स वेगळ्या डिश/बोल (bowl) मध्ये सव्‍‌र्ह केला जातो. ही जेवणाची पद्धत भारतीय भोजन पद्धतीच्या अगदी विरुद्ध आहे. आपण अनेक पदार्थ एकाच वेळी, एकाच ताटातून खातो. हा खूप मोठा फरक आपल्या जेवणाच्या पद्धतींमध्ये आहे.
या पाश्चात्त्य जेवण पद्धतीतल्या चालीरीतींविषयी, त्यांच्या कटलरीजविषयी आणि पद्धतींविषयी आणखी माहिती येणाऱ्या ‘फाइन डाइन’ सदरातून मधून मिळेलच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2016 1:02 am

Web Title: french classical menu
टॅग Viva
Next Stories
1 वाढण्याची गंमत
Just Now!
X