फॉर्मल सीटडाऊन समारंभाच्या वातावरणाविषयी, आमंत्रणांविषयी आपण गेले दोन आठवडे बोलतो आहोत. फॉर्मल समारंभ हे बहुधा भव्य बँक्वेट हॉलमध्ये होतात. या हॉल्सच्या बाहेर जी लॉबी असते त्यात टेबल्स घालून सगळ्यांना सीटिंग अरेंजमेन्टची माहिती देण्याची व्यवस्था असते. या समारंभात प्रत्येक आमंत्रिताला त्याची जागा आखून दिलेली असते. आपली जागा कोणती हे आपल्याला कसं समजेल?

हॉल्सच्या बाहेर जी टेबल्स असतात तिथे समारंभाची व्यवस्था बघणारे काहीजण असतात. त्यांच्याकडे जाऊन आपलं नाव सांगितलं की, आपल्याला ते आपला टेबल नंबर सांगतात. त्यांच्याच बाजूला चौकटीवर फळा ठेवला असतो, ज्यावर समारंभाच्या खोलीचा नकाशा असतो. या नकाशात जेवणाच्या टेबल्सची रचना असते. प्रत्येक टेबलला नंबर दिलेला असतो आणि आपला नंबर बघून आपण आपलं टेबल आतल्या हॉलमध्ये शोधायचं असत. टेबलवर नंबर ठळकपणे दिसेल अशा जागी लावला असतो; नाही सापडलं तर वेटर मदतीला असतातच. साधारणत: रचना अशी असते की, हॉलच्या मध्यभागी प्रमुख पाहुण्यांचं टेबल असतं. त्या टेबलच्या भोवती इतर टेबल्सची मांडणी असते.

प्लेस कार्ड्स
टेबल मिळाल्यानंतरही पाहिजे तिथे बसता येत नाही. टेबलवर संपूर्ण जेवणाचं सेटिंग केलं असतं आणि त्या सेटिंगच्या वरच्या भागात, ज्या व्यक्तीसाठी ती जागा आखून ठेवली असते, त्या व्यक्तीचं नाव एका कार्डवर लिहून ठेवलं असतं. या कार्ड्सना प्लेस कार्ड्स म्हणतात. कोणी कुठे बसावं हे यजमान स्वत: ठरवतात आणि त्यांनी ते विचारपूर्वक केलेलं असतं. व्यावसायिक चर्चा करण्यास सोयीचं जावं किंवा काही व्यक्तींची एकमेकांबरोबर नीट ओळख व्हावी यासाठी एकाच टेबलवर बसवलं जातं. सरकारी किंवा व्यावसायिक समारंभात आमंत्रितांच्या पदानुसार आसन व्यवस्था असते.

पती- पत्नीला एकमेकांच्या शेजारी तर कधीच बसवत नाहीत; एकाच टेबलवर पण फारच क्वचित. तसेच मित्र-मित्र किंवा एकमेकांच्या ओळखीची माणसंही सहसा एका टेबलवर नसतात. हय़ाच्या मागचा उद्देश असा की, ओळखीच्या लोकांनी स्वत:चे कंपू करू नये, ज्यामुळे टेबलवरच्या इतर ओळख नसलेल्यांना अवघडल्यासारखं होऊ शकत किंवा दुर्लक्षित वाटू शकत.

पाहिजे त्या व्यक्तीशेजारी बसण्यासाठी काही जण प्लेस कार्डसची अदलाबदल करतात. असं करणं अयोग्य. कारण यजमानीणबाईंचा रोष पत्करणं नाकारता येत नाही आणि त्यातून गोंधळही होऊ शकतो. शाकाहारींसाठी वेगळं टेबल नसतं तेंव्हा त्यांच्या आसनांच्या मागे खूण केली असते जेणेकरून वेटरला समजतं की, ती व्यक्ती शाकाहारी आहे. पथ्याचं जेवण असलेल्या व्यक्तीलापण चुकीचं जेवण मिळून गोंधळ व्हायची शक्यता टाळता येत नाही.