दुसऱ्या महायुद्धातील सर्वोत्कृष्ट तोफांत गणना करावी अशी तोफ एका तटस्थ देशात तयार झाली होती. स्वीडनच्या बोफोर्स कंपनीने तयार केलेली ४० मिमी व्यासाची विमानवेधी तोफ या युद्धात मित्र राष्ट्रांबरोबरच (ब्रिटन, फ्रान्स, रशिया, अमेरिका) अक्ष राष्ट्रांनीही (जर्मनी, इटली, जपान) यांनीही वापरली.

मुळात ही तोफ स्वीडनच्या नौदलासाठी तयार करण्यात आली होती. पण तिच्या गुणवत्तेमुळे लवकरच या तोफेला युरोपच्या अनेक देशांतून मागणी येऊ लागली आणि १९३० च्या दशकाच्या मध्यापर्यंत युरोपभरच्या सेनादलांतून ती वापरली जात होती. या काळापर्यंत विमानांचा युद्धात वापर सुरू झाला होता आणि विमाने पाडण्यासाठी तोफांचा वापर होणेही क्रमप्राप्त होते. त्यामुळे विमानवेधी तोफांना मोठी मागणी आली होती. या तोफेची सर्वात मोठी जमेची बाजू होती ती तिची वेगाने गोळे डागण्याची क्षमता(रेट ऑफ फायर). ही तोफ एका मिनिटात १२० गोळे डागू शकत असे.  त्यासह तिची ‘मझल व्हेलॉसिटी’ म्हणजे तोफगोळयाचा हवेतून प्रवास करण्याचा वेगही अधिक होता.  बोफोर्सचे तोफगोळे एका सेकंदाला ८५४ मीटर (२८०२ फूट) इतक्या वेगाने प्रवास करत असत. या परिणामकारकतेमुळे बोफोर्सचे विक्री अधिकारी जेव्हा अन्य देशांत प्रात्यक्षिक देण्यासाठी जात तेव्हा ते आत्मविश्वासाने म्हणत, एक तोफगोळा डागून दाखवला की कंत्राट आमचेच!

या काळापर्यंत बंदुकांमध्ये ऑटोमॅटिक फायर  करण्याची क्षमता आली होती. पण तोफांच्या बाबतीत तो विचार अवघड होता. बोफोर्स ४० मिमी तोफेच्या बाबतीत हे शक्य होते. ही तोफ ऑटोमॅटिक फायर मोडमध्ये वापरता येत असे. कारण तिच्यातून डागलेल्या तोफगोळ्याचे मोकळे आवरण बाहेर फेकणे आणि नवा तोफगोळा फायरिंग चेंबरमध्ये आणणे या क्रिया स्वयंचलित पद्धतीने होत असत.

ही तोफ ०.९ किलोचा (१.९ पौंड) गोळा ७२०० मीटर (२३,६२२ फूट) उंचीपर्यंत डागू शकत असे. जर्मनीने या तोफा नॉर्वेमध्ये तयार केल्या आणि त्यांना ४० मिमी फ्लॅक २८ (बोफोर्स) असे नाव दिले. तर अमेरिकेने त्यांच्या देशात तयार केलेल्या बोफोर्स तोफेला ४० मिमी गन एम १ असे नाव दिले. या प्रकारच्या तोफा ब्रिटिश कॉमनवेल्थ देशांमध्येही मोठय़ा प्रमाणात बनवल्या गेल्या. दुसऱ्या महायुद्धात जगाच्या सर्व भागांतील लढायांमध्ये ही तोफ वापरली गेली.

या तोफेची २० मिमी व्यासाची आवृत्तीही १९३० च्या दशकात तयार करण्यात आली होती. याशिवाय बोफोर्सने १९३० च्या दशकानंतर अधिक अवजड तोफाही बनवल्या. त्यात ७५ आणि ८० मिमी व्यासाच्या तोफांचा समावेश होता. जर्मनीच्या क्रुप कंपनीच्या सहकार्याने त्यांनी ७५ मिमीच्या तोफा बनवल्या होत्या. या तोफा जर्मन ८८ मिमी तोफेसारख्याच दिसत. पण ७५ मिमी आणि ८० मिमी व्यासाच्या तोफा पूर्णपणे स्वीडिश बनावटीच्या असल्याचे बोफोर्सचे अधिकारी आवर्जून सांगत. या दोन्ही तोफाही मोठय़ा प्रमाणावर निर्यात करण्यात आल्या. युरोपमधील पूर्व आघाडीवर हंगेरीच्या सैन्याने ८० मिमी तोफांचा प्रामुख्याने वापर केला. या तोफेतून ८ किलो (१७.६ पौंड) वजनाचा गोळा १०,००० मीटर (३२,८१० फूट) इतक्या उंचीपर्यंत डागला जात असे.

सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com