अमेरिकी १०५ मिमी हॉवित्झर

पहिल्या महायुद्धापर्यंत (१९१४-१९१८) पल्ला, संहारकता आणि अचूकता या अक्षांवर शस्त्रांची बरीच प्रगती झाली होती. यातील खूपसा बदल तोफखान्याने प्रेरित केला होता. पहिल्या महायुद्धातील लढायांचे यश आणि हानी यात तोफांचा वाटा मोठा असला तरी या युद्धात तोफखान्याच्या काही त्रुटीही उघड झाल्या. त्यानुसार युद्धोत्तर काळात तोफांमध्ये बदल झाले.

पहिल्या महायुद्धात काही लहान तोफा वगळता अन्य तोफा अवजड होत्या. त्यांची युद्धभूमीवरील गतिमानता कमी होती. आगामी काळात वेगवान हालचालींना मोठे महत्त्व येणार होते. त्यामुळे तोफांचा आकार आणि ओढून नेण्याच्या पद्धतीत बदल होत गेले. अति अवजड तोफांचा वापर मागे पडला. तोफा ओढून नेण्यासाठी घोडय़ांची जागा यांत्रिक ट्रॅक्टर आदी वाहनांनी घेतली. छऱ्याचे तोफगोळे (श्रापनेल शेल) सैन्याविरुद्ध प्रभावी असले तरी खंदक नष्ट करण्यास उपयोगी नव्हते. त्यामुळे पहिल्या महायुद्धात अति ज्वालाग्राही (हाय एक्स्प्लोझिव्ह) तोफगोळ्यांवर भर होता.  पहिल्या महायुद्धातील सोम येथील लढाईत रणगाडय़ांचे आगमन झाले. त्यानंतर रणगाडाविरोधी तोफा तयार केल्या जाऊ लागल्या. रणगाडय़ांनी युद्धाला गती प्रदान केली. या बदललेल्या वेगवान युद्धनीतीशी जुळवून  घेण्यासाठी तोफांनाही जलद हालचाली करणे गरजेचे होते. त्यातून वाहनांनी ओढून नेण्याच्या तोफांएवजी (टोड आर्टिलरी) स्वयंचलित तोफांच्या (सेल्फ-प्रोपेल्ड आर्टिलरी) विकासावर भर दिला गेला.

तसेच या युद्धात टेहळणीसाठी विमानेही वापरली जाऊ लागली. धातूनिर्माण आणि स्फोटकांच्या शास्त्रात प्रगती झाल्याने तोफांचा पल्ला नजरेच्या टप्प्यापलीकडे वाढला होता. त्यामुळे तोफांचा मारा नियंत्रित करण्यासाठी ‘फॉरवर्ड ऑब्झव्‍‌र्हेशन ऑफिसर’ नेमले जात. पण ते काम धोक्याचे होते. आता त्यांच्या मदतीला नवे टेलिफोनसारखे संपर्क तंत्रज्ञान आणि विमाने आली होती. त्यानंतर विमानवेधी तोफा तयार होऊ लागल्या. याच काळात हवेतील लक्ष्याच्या मार्गाचा वेध घेऊन हवेत विशिष्ट उंचीवर फुटणाऱ्या तोफगोळ्यांचा (एअर बर्स्ट शेल्स) शोध लागला. तोफगोळ्याचा जमिनीवर आघात होऊन स्फोट घडवणाऱ्या ‘इम्पॅक्ट फ्यूज’प्रमाणे ‘प्रॉक्झिमिटी फ्यूज’ आणि ‘टाइम फ्यूज’च्या शोधाने याला हातभार लावला होता.

पहिल्या महायुद्धात अमेरिकेचा तोफखाना अन्य देशांच्या तुलनेत बराच मागास होता. अमेरिकेने बहुतांशी फ्रान्स व ब्रिटनकडून घेतलेल्या तोफा वापरल्या होत्या. युद्धानंतर या परावलंबित्वावर मात करण्यासाठी अमेरिकेने बरेच कष्ट घेतले. अमेरिकेने १९१९ साली जनरल विल्यम वेस्टरव्हेल्ट यांच्या अध्यक्षतेखाली ‘कॅलिबर बोर्ड’ स्थापन केले. हे मंडळ ‘वेस्टरव्हेल्ट बोर्ड’ नावानेच गाजले. त्याने अमेरिकेच्या, तसेच सर्व मित्र देशांच्या तोफांचा, त्यांच्या गुण-दोषांचा, सैनिकांच्या गरजांचा अभ्यास केला आणि नव्या तोफांच्या विकासासाठी अभ्यासपूर्ण शिफारसी सादर केल्या. त्यांनी पुढील ३० वर्षांच्या काळातील अमेरिकी तोफखान्याच्या विकासाची दिशा ठरवली आणि पुढील मार्गावर दूरगामी परिणाम केला. यातूनच १९३९ साली अमेरिकेच्या १०५ मिमी हॉवित्झरसारखी  प्रसिद्ध तोफ आकाराला आली. ही तोफ एका मिनिटात १५ किलोचे चार गोळे ११ किमी अंतरावर डागत असे. दुसऱ्या महायुद्धातील ही सर्वात महत्त्वाची तोफ बनली. १९४१ ते १९४५ दरम्यान अमेरिकेने अशा ८५०० हून अधिक तोफा बनवल्या. याशिवाय १५५ आणि २४० मिमी हॉवित्झर्सही बनवल्या. त्यातून पहिल्या महायुद्धात निकृष्ट असलेला अमेरिकी तोफखाना दुसऱ्या महायुद्धात सवरेत्कृष्ट बनला होता.

सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com