23 January 2021

News Flash

गाथा शस्त्रांची : अग्नि क्षेपणास्त्र

शत्रूवर जरब बसवण्याचे साधन म्हणून त्याची किंमत (डिटेरन्स व्हॅल्यू) मोठी आहे.

सचिन दिवाण sachin.diwan@expressindia.com

पृथ्वी क्षेपणास्त्राने भारताला मूलभूत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळाले. त्याचा युद्धात डावपेचात्मक (टॅक्टिकल) पातळीवर फायदा मिळू शकतो. मात्र अग्नि क्षेपणास्त्राने देशाला असे तंत्रज्ञान असणाऱ्या काही मोजक्या देशांच्या पंक्तीत नेऊन बसवले. अग्नि हे स्ट्रॅटेजिक (व्यूहात्मक) मिसाइल आहे. त्याचा परिणाम केवळ लष्करी क्षेत्रापुरता मर्यादित नसून त्याने देशाला जागतिक राजनैतिक मंचावर नवे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्याने भारताला अण्वस्त्रांनिशी लांब पल्ल्यावर मारा करण्याची क्षमता प्रदान केली असून देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे साधन मिळवून दिले आहे. शत्रूवर जरब बसवण्याचे साधन म्हणून त्याची किंमत (डिटेरन्स व्हॅल्यू) मोठी आहे. यातून केवळ युद्ध टाळण्याची किंवा प्रसंगी युद्ध जिंकण्याची क्षमता मिळते.

अग्नि क्षेपणास्त्राचा विकासही १९८३ साली हाती घेण्यात आलेल्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत (इंटिग्रेटेड गायडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) करण्यात आला. पुढे या कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन अग्नि क्षेपणास्त्राला या उपक्रमातून वेगळे काढून त्यासाठी निधी आणि संशोधनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. अग्नि क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी चाचणी १९८९ साली घेण्यात आली आणि आजवर त्याच्या अग्नि-१, अग्नि-२ आणि अग्नि-३ या आवृत्ती सेनादलांत दाखल झाल्या असून पुढील अग्नि-४, अग्नि-५ आणि अग्नि-६ या आवृत्तींचा विकास आणि चाचण्या सुरू आहेत. ही सर्व क्षेपणास्त्रे १००० ते २००० किलो वजनाची पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतात. अग्नि-१, अग्नि-२ आणि अग्नि-३ चा पल्ला अनुक्रमे ७००, २५०० आणि ३५०० किमी आहे. तर अग्नि-४, अग्नि-५ आणि अग्नि-६ चा पल्ला अनुक्रमे ४०००, ५००० आणि ८००० ते १०,००० किमी आहे. यातील अग्नि-४ आणि अग्नि-५ च्या चाचण्या सुरू असून ती क्षेपणास्त्रे लवकरच सेनादलांच्या ताफ्यात सामील होती. तर अग्नि-६ हे विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. अग्नि-५ आणि अग्नि-६ वर एकापेक्षा जास्त अण्वस्त्रे बसवून ती एकाच वेळी, वेगवेगळ्या लक्ष्यांवर टाकण्याची सोय करण्याचा प्रस्ताव आहे. त्याला मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रि-एंट्री व्हेइकल (एमआयआरव्ही) तंत्रज्ञान म्हटले जाते. त्याने सर्व आशिया आणि युरोप व आफ्रिकेचा काही भाग माऱ्याच्या टप्प्यात आला आहे.

अग्नि क्षेपणास्त्रे जमिनीपासून २०० ते ३५० किमी उंचीवरून, एका सेकंदाला २.५ ते ३.५ किमी इतक्या वेगाने प्रवास करतात. त्यानंतर लक्ष्यावर पडण्यापूर्वी पृथ्वीच्या वातावरणात पुनर्प्रवेश (रि-एंट्री) करताना प्रचंड वेगामुळे त्याचा वातावरणाशी घर्षणाने पेट घेऊन नाश हेण्याचा धोका असतो. यावेळी त्याच्या पृष्ठभागावर २५०० ते ३००० पेक्षा अधिक अंश सेल्सिअस तापमान असते. मात्र त्याच्या आतील स्फोटकांना किंवा अण्वस्त्राला त्याची बाधा होऊ नये म्हणून खास उष्णतारोधी आवरण (हीट शिल्ड) बसवलेले असते. त्यामुळे आतील तापमान ४० ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत राखले जाते. अग्नि-३ क्षेपणास्त्राची नेम चुकण्याची शक्यता (सक्र्युलर एरर प्रॉबेबिलिटी – सीईपी) साधारण ४० मीटर आहे. लांब पल्ल्याच्या किंवा आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या बाबतीत इतकी अचूकता बरीच चांगली मानली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2018 3:57 am

Web Title: agni missile information
Next Stories
1 गाथा शस्त्रांची : पृथ्वी क्षेपणास्त्र
2 लक्ष्य, निशांत आणि रुस्तम ड्रोन
3 ध्रुव हेलिकॉप्टर
Just Now!
X