मॅकडोनेल डग्लस एफ-४ फँटम हे लढाऊ विमान १९६० ते १९८० या दशकांदरम्यान जगभरात अमेरिकी हवाई प्रभावाचे प्रतीक बनले होते. शीतयुद्ध ऐन भरात असताना व्हिएतनामच्या संघर्षांत फँटम आणि सोव्हिएत युनियनच्या मिग-२१ विमानांच्या सुपरसॉनिक (स्वनातीत किंवा ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाच्या) हवाई लढती या कोरियन युद्धातील एफ-८६ सेबर आणि मिग-१५ यांच्या द्वंद्वाइतक्यात संस्मरणीय आहेत.

फँटमचे पहिले उड्डाण १९५८ साली झाले आणि अमेरिकेसह ११ देशांच्या हवाई दलात ते अगदी अलीकडेपर्यंत कार्यरत होते. त्यात ऑस्ट्रेलिया, इजिप्त, जर्मनी, ग्रीस, इराण, इस्रायल, जपान, दक्षिण कोरिया, स्पेन आणि तुर्कस्तान आदी देशांचा समावेश आहे. जर्मन हवाईदलातील फँटम २०१५ पर्यंत वापरात होती.

अमेरिकेने एफ-८६ सेबर, एफ-१०४ स्टारफायटर, एफ-१०५ थंडरचीफ आणि एफ-३ एच डेमॉन या विमानांच्या पुढील आवृत्तीचे विमान म्हणून एफ-४ फँटमचा विकास केला. प्रथम त्याची रचना नौदलाच्या ताफ्यातील विमानवाहू नौकांना संरक्षण देणारे विमान म्हणून केली होती. पण नंतर ते सुपरसॉनिक जेट इंटरसेप्टर, एअर सुपेरिऑरिटी एअरक्राफ्ट, क्लोझ एअर सपोर्ट, एअर डिफेन्स सप्रेशन (शत्रूची रडार जॅम करणे), लाँग रेंज स्ट्राइक, फ्लीट डिफेन्स, अ‍ॅटॅक अँड रेकोनेसन्स अशा विविध भूमिकांमध्ये वापरले गेले. एक बहुउद्देशीय लढाऊ विमान म्हणून त्याची उपयुक्तता होती.

फँटमच्या रचनेत अनेक वैशिष्टय़े होती. त्याचे मुख्य पंख टोकाला थोडे वर झुकलेले आणि शेपटाकडील लहान पंख जमिनीकडे झुकलेले होते. फँटमच्या बांधणीत टायटॅनियम या मजबूत धातूचा मुबलक वापर केला होता. फँटम हे दोन इंजिने असलेले आणि दोघांना बसण्याची सोय असलेले विमान होते. एक इंजिन बंद पडले तर किमान दुसरे इंजिन चालू राहून वैमानिक तळावर सुखरूप परत यावा ही त्यामागची भूमिका होती. त्याने विमानाला पुरेशी ताकदही मिळत होती. हे विमान ध्वनीच्या दुप्पट वेगाने प्रवास करत असे आणि ८५०० किलो बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे वाहून नेत असे. वैमानिकाचा सहकारी युद्धात अन्य उपकरणे हाताळून मदत करत असे. त्यावर पल्स-डॉपलर रडार होते. फँटमचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यावर मशिनगन किंवा कॅनन नव्हती. त्याऐवजी साइडवाइंडर आणि स्पॅरो ही क्षेपणास्त्रे होती. सुरुवातीला ती फारशी अचूक नव्हती. क्षेपणास्त्रांमुळे शत्रूची विमाने फँटमच्या आसपास फिरकू शकणार नाहीत आणि त्यामुळे जवळच्या लढाईसाठी कॅननची गरज नाही, अशी त्यामागे भूमिका होती. पण मिग-२१ विमानांनी हा विचार बदलण्यास भाग पाडले. फँटमच्या सुधारित आवृत्तींवर कॅनन बसवली गेली.

अमेरिकी एफ-४ फँटम

 

sachin.diwan@ expressindia.com