News Flash

जमिनीवरून हवेत मारा करणारी अमेरिकी क्षेपणास्त्रे

अमेरिकेने कमी अंतरावरील विमाने किंवा क्षेपणास्त्रे पाडण्यासाठी सी-स्पॅरो, स्टिंगर, पॅट्रियट, स्टँडर्ड आदी क्षेपणास्त्रे विकसित केली.

नाइके-अजॅक्स क्षेपणास्त्र

सचिन दिवाण

लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांच्या प्रसाराबरोबरच त्यांना थोपवणारी यंत्रणारीही विकसित होऊ लागली. सोव्हिएत क्षेपणास्त्रांचा पहिला धोका पश्चिम युरोप आणि ब्रिटनला जाणवत होता. अमेरिका सोव्हिएत युनियनच्या टप्प्यात यायला अजून वेळ होता.

ब्रिटनने सोव्हिएत विमाने आणि क्षेपणास्त्रे हवेतच पाडण्याच्या उद्देश्याने १९५४ मध्येच व्हायोलेट फ्रेंड नावाने गुप्त प्रकल्प चालू केला होता. त्याअंतर्गत सोव्हिएत क्षेपणास्त्रे पाडण्यासाठी ब्रिटनची ब्लडहाऊंड आणि थंडरबर्ड ही क्षेपणास्त्रे वापरली जाणार होती. मात्र त्या काळात ब्रिटनला निधीची कमतरता जाणवत होती. तसेच सोव्हिएत युनियन किंवा त्यांच्या प्रभावाखालील पूर्व जर्मनीपासून ब्रिटनचे अंतर कमी असल्याने त्यांना क्षेपणास्त्रे हेरून ती टिपण्यासाठी अत्यल्प वेळ मिळाला असता. या कारणांनी ब्रिटिश कार्यक्रम मागे पडला.

अमेरिकेमध्येही १९५० च्या दशकात जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या (सरफेस टू एअर मिसाइल – सॅम) विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यासाठी नाइके मालिकेतील अग्निबाण वापरले होते. या मालिकेतील पहिले नाइके एजॅक्स नावाचे क्षेपणास्त्रे १९५३ साली सज्ज झाले. ते हवेत १५ किलोमीटर उंचीवरील विमाने पाडू शकत असे. त्यापुढील नाइके हक्र्युलस नावाचे क्षेपणास्त्र १६० किमी अंतरावर, ३० किमी उंचीवर मारा करू शकत असे. त्यावर अण्वस्त्रेही बसवता येत. त्यानंतरचे नाइके झ्युस हे क्षेपणास्त्र ताशी १२,८७५ किमीच्या वेगाने प्रवास करून २८० किमीवरील लक्ष्याचा वेध घेत असे.

त्यापुढे नाइके एक्स, स्पार्टन आणि स्प्रिंट ही क्षेपणास्त्रे विकसित करण्यात आली. स्पार्टन आणि स्प्रिंट या दोन्ही क्षेपणास्त्रांवर अण्वस्त्रे बसवली होती. त्यातील स्पार्टन हे लांब पल्ल्याचे म्हणजे हवेत ७०० किमीहून अधिक अंतरावर शत्रूचे क्षेपणास्त्र पाडण्यासाठी तयार केले होते. तर त्याच्या माऱ्यातून वाचून शत्रूचे क्षेपणास्त्र कमी उंचीवर पोहोचल्यास ते लक्ष्यापासून साधारण ६० किमी उंचीवर असताना पाडण्यासाठी स्प्रिंट क्षेपणास्त्र तयार केले होते.

अमेरिकेने कमी अंतरावरील विमाने किंवा क्षेपणास्त्रे पाडण्यासाठी सी-स्पॅरो, स्टिंगर, पॅट्रियट, स्टँडर्ड आदी क्षेपणास्त्रे विकसित केली. सी-स्पॅरो युद्धनौकेवरून डागल ेजाते आणि ते हवेत १९ किमी अंतरावरील लक्ष्याचा वेधे घेऊ शकते. स्टिंगर क्षेपणास्त्र एकटा सैनिक खांद्यावरून डागू शकतो आणि त्याचा पल्ला १५,७५० फूट आहे. पॅट्रियट हे गायडेड क्षेपणास्त्र असून ते १६० किमी अंतरावरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते. आरआयएम-१६१ स्टँडर्ड-३ क्षेपणास्त्र युद्धनौकेवरून डागले जाते आणि ते ७०० ते २५०० किमी अंतरावरील लक्ष्याचा हवेत वेध घेऊ शकते.

sachin.diwan@ expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 3:48 am

Web Title: american missiles operating in the air
Next Stories
1 ‘स्कड’ आणि क्षेपणास्त्रांचा प्रसार
2 अमेरिकेची पोलॅरिस, पोसायडॉन आणि ट्रायडेंट क्षेपणास्त्रे
3 रशियाची अत्याधुनिक टोपोल, यार्स, सरमत क्षेपणास्त्रे
Just Now!
X