News Flash

अमेरिकी पॅटन रणगाडा

सियालकोट सेक्टरमध्ये पहिली मोठी लढाई फिलोरा येथे १० आणि ११ सप्टेंबरला लढली गेली.

अमेरिकी पॅटन रणगाडा

दुसऱ्या महायुद्धात रशियातील कस्र्क येथे रणगाडय़ांची जगातील सर्वात मोठी लढाई झाली होती. त्या खालोखाल मोठय़ा लढाया १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात झाल्या. छांब, खेमकरण, असल उत्तर, चविंडा, फिलोरा येथे रणगाडय़ांचे घनघोर रणसंग्राम झाले. त्यांनीच युद्धाचे पारडे भारताच्या बाजूने फिरवले.

सियालकोट सेक्टरमध्ये पहिली मोठी लढाई फिलोरा येथे १० आणि ११ सप्टेंबरला लढली गेली. ११ सप्टेंबरला भारताने फिलोरा जिंकले. पण या लढाईत भारताचे लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बी. तारापोर यांना वीरमरण आले. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन गौरवण्यात आले. पाकिस्तानमधील चविंडा येथे मोठा रणसंग्राम झाला. १९६५ च्या युद्धातील सर्वात महत्त्वाची रणगाडय़ांची लढाई पंजाबमधील असल उत्तर या ठिकाणी लढली गेली. पाकिस्तानी सैन्याने सीमेजवळील खेमकरण हे भारतीय गाव जिंकून घेतले होते. त्याला भारताने असल उत्तर येथे खणखणीत उत्तर दिले. या लढाईत भारताने पाकिस्तानी पॅटन रणगाडय़ांचा धुव्वा उडवला. पाकिस्तानचे ९९ पॅटन रणगाडे भारताने नष्ट केले, तर भारताचे १० रणगाडे निकामी झाले. असल उत्तरजवळ नष्ट झालेल्या आणि पकडलेल्या पॅटन रणगाडय़ांचे ‘पॅटन नगर’च उभे राहिले. त्यामुळे असल उत्तरला आजही पाकिस्तानी पॅटन रणगाडय़ांची दफनभूमी (ग्रेव्ह-यार्ड ऑफ पॅटन टँक्स) म्हणून ओळखले जाते. याच लढाईत कंपनी क्वार्टरमास्टर हवालदार (सीक्यूएम) अब्दुल हमीद यांनी जीप माऊंटेड रिकॉइललेस गनच्या साहाय्याने तीन ‘एम-४७ पॅटन’ रणगाडे उद्ध्वस्त केले. चौथ्या रणगाडय़ाने मात्र त्यांना टिपले. त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देण्यात आले.

वास्तविक पाकिस्तानने अमेरिकेकडून घेतलेले पॅटन हे त्यावेळचे जगातील सर्वोत्तम रणगाडे मानले जायचे. त्याविरुद्ध भारताचे ब्रिटिश आणि अमेरिकी बनावटीचे सेंच्युरियन आणि शेरमन हे रणगाडे बरेच जुने असूनही वरचढ ठरले.

दुसऱ्या महायुद्धातील गाजलेले अमेरिकी जनरल जॉर्ज एस. पॅटन यांच्या नावाचा एम-४७ हा रणगाडा १९५२ साली अस्तित्वात आला. साधारण ४८ टन वजनाच्या या रणगाडय़ाचे चिलखत १०० मिमी जाड होते आणि त्यावर ९० मिमी व्यासाची मुख्य तोफ आणि मशिनगन होत्या. त्याचा वेग ताशी ४८ किमी इतका होता. हा रणगाडा अमेरिकेने पाकिस्तानसह ‘नाटो’ आणि ‘सिएटो’ या संघटनांमधील अनेक मित्रदेशांना दिला होता. त्याने भारत-पाकिस्तानसह, अरब-इस्रायल, तुर्कस्तान-सायप्रस, इराण-इराक आदी युद्धे, सोमालिया आणि युगोस्लाव्हियातील गृहयुद्ध आदी संघर्षांत महत्त्वाची भूमिका निभावली.

sachin.diwan@ expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 1:10 am

Web Title: american patton tank
Next Stories
1 ब्रिटिश क्रुझर रणगाडे
2 अमेरिकी शेरमन रणगाडा
3 जर्मन आक्रमण परतवणारे रशियन ‘टी-३४’
Just Now!
X