News Flash

दुसऱ्या महायुद्धातील रणगाडाविरोधी तोफा

पहिल्या महायुद्धात १९१६ साली फ्रान्समधील सोम येथील लढाईत ब्रिटनने सर्वप्रथम रणगाडे वापरले. त्यानंतर रणगाडय़ांचा प्रसार वेगाने झाला. मग रणगाडय़ांचे चिलखत भेदणाऱ्या शस्त्रांची गरज भासू लागली.

जर्मन पॅक ४० तोफ

पहिल्या महायुद्धात १९१६ साली फ्रान्समधील सोम येथील लढाईत ब्रिटनने सर्वप्रथम रणगाडे वापरले. त्यानंतर रणगाडय़ांचा प्रसार वेगाने झाला. मग रणगाडय़ांचे चिलखत भेदणाऱ्या शस्त्रांची गरज भासू लागली. त्यातून रणगाडाविरोधी तोफांची (अँटि-टँक गन) निर्मिती झाली. सुरुवातीला रणगाडय़ांचे चिलखत कमी जाडीचे होते. तेव्हा ते भेदणाऱ्या तोफाही कमी क्षमतेच्या होत्या. जसजशी चिलखताची जाडी वाढू लागली तसतशा तोफाही अधिक क्षमतेच्या बनत गेल्या. तसेच सुधारित प्रकारचे तोफगोळे वापरात येऊ लागले. सुरुवातीच्या रणगाडाविरोधी तोफा तोफगोळ्याच्या वेगावर अवलंबून असत. पण नंतर ‘शेप्ड चार्ज’ आणि ‘हॉलो चार्ज’ प्रकारच्या तोफगोळ्यांच्या विकासाने रणगाडाविरोधी तोफांना अधिक शक्ती प्रदान केली.

ब्रिटिशांकडील सुरुवातीच्या रणगाडाविरोधी तोफांमध्ये ऑर्डनन्स क्यूएफ २ पौंडी तोफेचा समावेश होता. ही तोफ व्हिकर्स-आर्मस्ट्राँग कंपनीने १९३४ साली तयार केली होती. ती ४५७ मीटरवरील रणगाडय़ाचे जास्तीत जास्त ५ सेंटिमीटरचे कवच भेदू शकत असे. १९४० साली फ्रान्समधील आणि त्यानंतरच्या उत्तर आफ्रिकेतील लढायांमध्ये ही क्षमता जर्मन रणगाडय़ांचा नाश करण्यास अपुरी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर ब्रिटिशांनी १९४१ साली वापरात आणलेली ६ पौंडी तोफ ९१४ मीटरवरून (१००० यार्ड) ६.८ सेंमीचे चिलखत भेदू शकत असे. ब्रिटिश ६ पौंडी तोफेचा आर्मर पियर्सिग डिस्कार्डिग सॅबो (एपीडीएस) प्रकारचा गोळा १४६ मिमी जाडीचे चिलखत भेदत असे. त्यात टंगस्टनची टोकदार सळई वापरली जात असे. अमेरिकेनेही त्यांची ३७ मिमी व्यासाची रणगाडाभेदी तोफ अपुरी असल्याचे जाणवल्यानंतर ब्रिटिश ६ पौंडी तोफ स्वीकारली आणि तिचे ५७  एमएम अँटि-टँक गन एम १ असे नामकरण केले.

पण १९४३ सालापर्यंत रणभूमीवर जर्मन टायगर रणगाडय़ाचे आगमन झाले. त्याचे चिलखत सर्वात जाडजूड आणि भक्कम होते. ते फोडण्यासाठी त्या काळी अस्तित्वात असलेल्या बहुतांशी सर्व तोफा कुचकामी होत्या. त्यामुळे ब्रिटिशांनी टायगर रणगाडय़ांचा समाचार घेण्यासाठी ६ पौंडी तोफांचा वापर बंद करून १७ पौंडी तोफ तयार केली. मात्र ही तोफ प्रत्यक्ष रणभूमीवर अवतरण्यास १९४३ साल उजाडले.  या वर्षी इटलीतील युद्धात प्रथम १७ पौंडी रणगाडाविरोधी तोफेचा वापर झाला. ती तोफ ९१४ मीटरवरून १३ सेंमी. (५.१२ इंच) जाडीचे चिलखत भेदत असे. त्यानंतर ब्रिटिश सैन्याने तिचा सार्वत्रिक वापर केला. सोव्हिएत युनियनच्या वाढत्या जाडीच्या रणगाडय़ांचा सामना करण्यासाठी जर्मनीने १९३९ साली ७५ मिमी व्यासाची पॅक ४० नावाची रणगाडाविरोधी तोफ तयार केली. तिच्यातून आर्मर पियर्सिग कॉम्पोझिट रिजिड (एपीसीआर) आणि हाय एक्स्प्लोझिव्ह (एचई) प्रकारचे तोफगोळे डागता येत. त्यांनी अनुक्रमे १५४ आणि १३२ मिमी जाडीचे चिलखत भेदले जात असे.

सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 4:54 am

Web Title: anti tank gun in second world war
Next Stories
1 दुसऱ्या महायुद्धातील सर्वोत्कृष्ट : बोफोर्स ४० मिमी तोफ
2 गाथा शस्त्रांची : ब्रिटिश २५ पौंडी तोफ आणि अल-अलामिनचा संग्राम
3 गाथा शस्त्रांची : जर्मन फ्लॅक तोफ आणि रोमेलचा झंझावात
Just Now!
X