दुसऱ्या महायुद्धात गाजलेल्या रणगाडय़ांमध्ये अमेरिकेच्या एम-४ शेरमन रणगाडय़ाचे स्थान बरेच वरचे आहे. या रणगाडय़ाला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढीच त्यावर टीकाही झाली. तरीही एकंदर परिणामकारकतेचा विचार करता तो नक्कीच एक प्रभावी रणगाडा होता.

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेची रणगाडा वापराची रणनीती अन्य देशांपेक्षा थोडी वेगळी होती. त्यानुसार शत्रूच्या आघाडीच्या फळीला तोफखाना आणि अन्य दलांच्या मदतीने खिंडार पाडले जात असे. त्यानंतर त्याचा फायदा घेण्यासाठी रणगाडे त्यातून वेगाने घुसून शत्रूच्या पिछाडीवर हल्ला करून त्याला नेस्तनाबूत करत. अमेरिकेच्या या धोरणाशी शेरमन रणगाडय़ाची रचना अगदी सुसंगत होती. तो एक मध्यम वजनाचा, वेगवान क्रुझर प्रकारचा रणगाडा होता. त्याचे चिलखत ६० ते १२० मिमी इतक्या जाडीचे होते. त्यावर ७५ मिमी व्यासाची शक्तिशाली तोफ आणि ब्राऊनिंग मशिनगन होती. साधारण ४० किमी प्रतितास वेगाने तो एका दमात १९० किमीपर्यंत प्रवास करत असे.

त्याच्या अन्य खुबींबरोबरच त्याची मोठय़ा संख्येने उपलब्धता हेदेखील अमेरिका आणि ब्रिटन आदी मित्र देशांसाठी बलस्थान होते. रशियाचे सैन्यबळ आणि अमेरिकेचे शस्त्रबळ यांच्या जोरावर ब्रिटनने दुसरे महायुद्ध जिंकले असे म्हटले जाते. ते बऱ्याच अंशी खरे आहे. युद्धाने बेचिराख झालेल्या युरोपच्या मुख्य भूमीपासून अटलांटिक समुद्राने वेगळे पडलेल्या अमेरिकेत युद्धकाळात जोरदार औद्योगिक उत्पादन सुरू होते. त्याचा अमेरिकेला महासत्ता बनवण्यात मोठा हात आहे. शेरमन त्याचे एक जिवंत उदाहरण आहे. युद्धाच्या पूर्वार्धात १९४० पर्यंत अमेरिकेने केवळ ३६५ आधुनिक रणगाडे बनवले होते. मात्र उत्तरार्धात १९४५ पर्यंत अमेरिकेने ४९,२३४ शेरमन रणगाडय़ांचे उत्पादन केले होते. रशियाचे टी-३४ रणगाडेही अशाच प्रकारे मोठय़ा संख्येने उपलब्ध होते आणि संख्येमध्ये एक वेगळेच बळ असते असे जोसेफ स्टालिनचे म्हणणे होते.

शेरमन रणगाडय़ांनी उत्तर आफ्रिकेतील टय़ुनिशिया, लिबिया, इजिप्तमधील अल-अलामीनचा संग्राम अशा लढायांत महत्त्वाची कामगिरी बजावली. तसेच ६ जून १९४४ रोजी मित्र देशांनी फ्रान्समधील नर्ॉमडी येथे सैन्य उतरवले आणि दुसरी आघाडी उघडली. त्यातही शेरमन रणगाडय़ांची भूमिका महत्त्वाची होती. इटलीजवळील सिसिली बेटावरील कारवाईत शेरमन डीडी (डय़ुप्लेक्स ड्राइव्ह) ही पाण्यातून जाऊ शकणारी आवृत्ती वापरली होती. जर्मनीच्या पँझर-३ आणि ४ रणगाडय़ांविरुद्ध शेरमनची कामगिरी उत्तम होती. पण एकदा किनाऱ्यावरून फ्रान्सच्या अंतर्गत भागातील शेतांच्या बांधांवरील गर्द झुडपांच्या प्रदेशात (हेज रोज) शिरल्यानंतर जर्मन पँथर आणि टायगर रणगाडय़ांपुढे मात्र शेरमन रणगाडय़ांचे मोठे नुकसान होऊ लागले. शत्रूचा पहिला तोफगोळा लागल्यानंतर शेरमन लगेच पेट घेत. त्यामुळे जर्मनांनी शेरमनला ‘टॉमी कुकर’ असे नाव ठेवले. आदीच्या युद्धात त्या नावाचे छोटे स्टोव्ह सैन्यात वापरात होते. तर मित्रदेशांच्या सैनिकांनी शेरमनला ‘रॉन्सन’ असे नाव दिले हिते. त्याकाळी रॉन्सन नावाचे सिगरेट लायटर प्रसिद्ध होते. त्याप्रमाणे पहिल्याच खेपेत शेरमन खात्रीने पेट घेत असत. त्यावरून चेष्टेने हे नाव दिले गेले होते. भारताने १९६५ च्या युद्धात शेरमन आणि ब्रिटिश सेंच्युरियन रणगाडय़ांच्या मदतीने पाकिस्तानी पॅटन रणगाडय़ांचा सामना केला होता.

सचिन दिवाण

sachin.diwan@ expressindia.com