सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com

दिग्दर्शित ऊर्जा शस्त्रे किंवा डायरेक्टेड एनर्जी वेपन्स (डीईडब्ल्यू) हा शस्त्रांचा सर्वात आधुनिक प्रकार सध्या विकसित होत आहे. विविध साधनांच्या मदतीने लेझर किरण, मायक्रोव्हेव्ज किंवा पार्टिकल बीम यांसारखी ऊर्जा एकाच दिशेने, दूरवर केंद्रित करून तिचा शस्त्रासारखा मारा करणे याला डायरेक्टेड एनर्जी वेपन्स म्हणतात. आर्किमिडीजने सिरॅक्यूज बंदरावर हल्ला करणारी शत्रूची जहाजे बुडवण्यासाठी किनाऱ्यावर बसवलेल्या मोठय़ा आरशांच्या मदतीने सूर्यकिरण एकत्र करून जहाजांवर एकवटले होते. बहिर्गोल भिंगाच्या मदतीने सूर्यकिरण एका बिंदूवर एकवटून कागद जाळता येतो, त्याच तत्त्वाचा हा मोठय़ा प्रमाणावरील वापर होता. हे डायरेक्टेड एनर्जी वेपनचे प्राथमिक रूप मानता येईल. आता त्याच्या अधिक प्रगत आवृत्ती तयार होत आहेत. भविष्यातील शस्त्रे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

लेझर किरणे बऱ्याच अंतरापर्यंत विकेंद्रित न होता प्रवास करू शकतात. त्यातून मोठी ऊर्जा एखाद्या बिंदूवर केंद्रत करून त्याचा शस्त्रासारखा वापर करता येतो. मात्र वातावरणातील धूर, धूळ, धुके आदी घटकांमुळे लेझर किरणांचाही प्रभाव कमी होतो. त्याला परिणामाला ब्लूमिंग म्हणतात. ते टाळून लेझरचा प्रत्यक्ष शस्त्र म्हणून वापर करण्याचे आव्हान आहे.

स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ओव्हनमधील मायक्रोव्हेव लहरी यादेखील शस्त्रासारख्या वापरता येतात. त्या लहरी एकवटलेली ऊर्जा दूरवर वाहून नेऊ शकतात. त्याने बराच उत्पात घडवता येतो. एखाद्या क्षेत्रात मायक्रोव्हेव लहरी एकवटून तेथील तापमान वाढवता येते. त्याने सैनिकांच्या शरीरातील पाणी उकळू लागून असह्य़ वेदना होऊ शकतात. तसेच या ऊर्जेच्या वापराने इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी करता येतात. त्याने शत्रूच्या विमाने, क्षेपणास्त्रे आदींवरील संगणकीकृत यंत्रणा बंद पाडता येते. अशाच प्रकारे अवरक्त (इन्फ्रारेड) आणि अतिनील (अल्ट्रा-व्हायोलेट) किरणांचाही शस्त्र म्हणून वापर करता येतो. या प्रकारची किरणे मानवी दृश्य क्षमतेच्या पलीकडील आहेत. तसेच त्यांच्या वापराने स्फोटाचा आवाजही होत नाही. त्यामुळे त्यांचा वापर अधिक परिणामकारक ठरू शकतो.

विद्युतभारित कणांचा झोत म्हणजे चार्ज्ड पार्टिकल बीम हेदेखील अशाच प्रकारचे शस्त्र आहे. असे विद्युतभारित किंवा विद्युतभार नसलेले (न्यूट्रल) कण प्रकाशाच्या वेगाने (सेकंदाला ३ लाख किमी) लक्ष्यावर सोडता येतात. मात्र असा भारित कणांचा झोत तयार करण्यासाठी मोठी ऊर्जासाधने लागतात. त्यातून युद्धभूमीवर प्रत्यक्ष वापरासाठीची आटोपशीर शस्त्रे तयार करण्याचे आव्हान आहे.

इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स (ईएमपी) किंवा विद्युतचुंबकीय धक्का हा शस्त्रांचा नवा प्रकार आहे. पावसाळ्यात आकाशात वीज कडाडल्याने तयार होणारी विद्युतचुंबकीय ऊर्जा हे त्याचे नैसर्गिक उदाहरण आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स जनरेटर्सच्या मदतीने तसाच परिणाम कृत्रिमरीत्या तयार करता येतो. त्याने प्रत्यक्ष स्फोट न घडता ठरावीक क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे निकामी होतात. विद्युत दिवे, रेडिओ, टेलिव्हिजन, संगणक, मोबाइल फोन आदी बंद पाडून एखादे क्षेत्र थेट सोळाव्या शतकात नेता येते. बँकांचे, शेअर बाजाराचे, विमानतळांचे, रेल्वेचे संगणक आणि सव्‍‌र्हर असलेल्या ठिकाणी त्याचा वापर केला तर भयानक परिणाम होऊ शकतात.

प्लाझ्मा ही पदार्थाची चौथी अवस्था मानली जाते. त्यात पदार्थाचे अणू-रेणू अतिउष्ण आणि अतिउत्तेजित असतात. त्यांचाही वापर शस्त्रासारखा करता येतो. तसेच अन्य प्रकारच्या शस्त्रांपासून विमाने, युद्धनौका, शहरे आदींना वाचवण्यासाठी त्यांच्या सभोवताली प्लाझ्माचे संरक्षक कवचही तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.