15 October 2019

News Flash

निर्भय क्रूझ क्षेपणास्त्र

निर्भय हे स्वदेशी बनावटीचे क्रूझ क्षेपणास्त्र सध्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) विकसित केले जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

सचिन दिवाण

निर्भय हे स्वदेशी बनावटीचे क्रूझ क्षेपणास्त्र सध्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) विकसित केले जात आहे. त्याचा पल्ला १००० किमी असून ते ३०० किलो वजनाची स्फोटके वाहून नेऊ शकते. निर्भय हे सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा कमी (माक ०.६ ते माक ०.७) आहे. रशियाच्या सहकार्याने तयार केलेल्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा पल्ला सध्या ४५० किमीपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यापेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्यांवर क्रूझ क्षेपणास्त्राने मारा करण्यासाठी निर्भयचा पर्याय उपलब्ध असेल.

ओदिशातील बालासोरजवळील चंडिपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवरून (आयटीआर) निर्भयच्या आजवर पाच चाचण्या झाल्या असून त्यापैकी दोन यशस्वी ठरल्या आहेत. पहिली चाचणी १२ मार्च २०१३ रोजी झाली. त्यात क्षेपणास्त्राचा एक सुटा भाग निकामी झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव चाचणी अध्र्यावर थांबवावी लागली. १७ ऑक्टोबर २०१४ रोजी झालेली दुसरी चाचणी यशस्वी ठरली. तिसरी चाचणी १६ ऑक्टोबर २०१५ रोजी झाली. त्यात क्षेपणास्त्र १२८ किमी प्रवासानंतर नियोजित मार्गावरून भरकटले. चौथी चाचणी २१ डिसेंबर २०१६ रोजी झाली. त्यात प्रक्षेपण झाल्यावर ७०० सेकंदांनंतर क्षेपणास्त्र मार्गावरून भरकटल्याने चाचणी थांबवावी लागली. पाचवी चाचणी ७ नोव्हेंबर २०१७ रोजी झाली आणि ती यशस्वी ठरली. या चाचणीत क्षेपणास्त्राने ५० मिनिटांत ६४७ किमी अंतर पार केले आणि त्याच्या यंत्रणांनी अपेक्षेप्रमाणे काम केले.

निर्भयची लांबी ६ मीटर, रुंदी ०.५२ मीटर आणि वजन १५०० किलो आहे. प्रक्षेपणानंतर त्याला घनरूप इंधनावर आधारित बुस्टर रॉकेटने गती मिळते. अपेक्षित उंची आणि वेग गाठल्यानंतर हा टप्पा क्षेपणास्त्रापासून वेगळा होतो आणि पुढील प्रवास टबरेफॅन किंवा टबरेजेट इंजिनाच्या आधारावर होतो. तेव्हा क्षेपणास्त्रात दुमडून ठेवलेले पंख बाहेर येतात आणि विमानाप्रमाणे किंवा ग्लायडरप्रमाणे क्षेपणास्त्राला हवेत उठाव (लिफ्ट) देतात. निर्भयचा घनरूप इंधनाचा रॉकेट मोटर बुस्टर डीआरडीओच्या अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लॅबोरेटरीने (एएसएल) तयार केला आहे. बंगळुरू येथील गॅस टर्बाइन रिसर्च एस्टाब्लिशमेंटमध्ये (जीटीआरई) निर्भय क्षेपणास्त्रासाठी ‘माणिक’ या नावाचे टबरेफॅन इंजिन तयार केले जात आहे. निर्भयला दिशादर्शन करण्यासाठीची इनर्शिअल नेव्हिगेशन सिस्टिम आणि रिंग लेझर जायरोस्कोप डीआरडीओच्या रिसर्च सेंटर इमारत (आरसीआय) या केंद्रात बनवली आहे. जमिनीवरील रडार केंद्रावरून किंवा हवाईदलाच्या विमानांवरून निर्भयचा प्रवासादरम्यान माग ठेवता येतो. डीआरडीओच्या पुण्यातील तीन प्रयोगशाळांनी निर्भयच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. हाय एनर्जी मटेरिअल्स रिसर्च लॅबोरेटरीने (एचएमईआरएल) क्षेपणास्त्राच्या घनरूप इंधनाच्या बुस्टरसाठी काम केले आहे. आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंटने (एआरडीई) क्षेपणास्त्रावरील स्फोटके तयार केली आहेत. निर्भयवरून गरजेनुसार २०० ते ३०० किलो वजनाची आणि २४ वेगवेगळ्या प्रकारची स्फोटके किंवा बॉम्ब (वॉरहेड्स) लक्ष्यावर टाकता येतात. निर्भय क्षेपणास्त्राचा प्रक्षेपक पुण्यातील दिघी येथील रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट (इंजिनिअर्स) – आरअँडडीई (ई) – या प्रयोगशाळेने तयार केला आहे.

First Published on December 21, 2018 3:21 am

Web Title: article about nirbhay cruise missiles