सचिन दिवाण

शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यात पराकोटीचा अविश्वास होता. त्यामुळे एकमेकांच्या प्रदेशावर नजर ठेवणे, हेरगिरी करणे असे उद्योग जोरात सुरू होते. एकीकडे मानवी हेरगिरी (ह्य़ूमन इंटेलिजन्स) होत होती तर त्याबरोबरच तांत्रिक साधने वापरून केलेली हेरगिरी (टेक्लिकल इंटेलिजन्स) विकसित होत होती. त्यात कृत्रिम उपग्रहांचा वापर वाढेपर्यंत किंवा त्यानंतरही त्यांच्या बरोबरीने टेहळणी विमाने वापरली जात होती. त्यात अमेरिकेच्या यू-२ प्रकारच्या टेहळणी विमानांचे स्थान बरेच वरचे आहे. या विमानाच्या कामगिरीमुळे जग अणुयुद्धाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपले होते.

अमेरिकेच्या लॉकहीड कंपनीने १९५० च्या दशकात यू-२ या टेहळणी विमानाचा विकास केला. सोव्हिएत युनियनच्या विमानवेधी तोफा, विमानविरोधी क्षेपणास्त्रे, लढाऊ (इंटरसेप्टर) विमाने या सगळ्यांच्या टप्प्यात न येता अतिउंचावरून सोव्हिएत प्रदेशावर हेरगिरी करण्यासाठी या विमानाची रचना केली होती. ते २१,००० मीटर (७०,००० फूट) उंचीवरून खालील प्रदेशाचे उत्तम छायाचित्रण करू शकत असे. एका दमात ते २८०० किमी (१७०० मैल परिसरावर फिरू शकत असे. अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीकडून (सीआयए) १९५६ पासून ही विमाने वापरली जात.

सोव्हिएत रशियाने १९६० साली त्यांच्या स्वर्दोलोवस्क या ठिकाणावर हेरगिरी करणारे अमेरिकेचे यू-२ विमान जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राने पाडले. त्याचा वैमानिक फ्रान्सिस गॅरी पॉवर्स हा रशियाच्या हाती सापडला. त्यावरून सोव्हिएत नेते निकिता क्रुश्चेव्ह यांनी अमेरिकेविरुद्ध बरेच रान उठवले. या प्रकरणावरून उठलेला धुरळा बसेपर्यंत यू-२ विमानांनी आणखी एक प्रताप केला. यू-२वरील हायकॉन बी कॅमेऱ्याने सोव्हिएत युनियनने अमेरिकेजवळच्या क्युबा बेटावर बसवलेल्या क्षेपणास्त्रांची छायाचित्रे घेतली. त्यावरून अमेरिका आणि रशिया यांचे संबंध ताणले जाऊन जग अणुयुद्धाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपले. या काळात सोव्हिएत क्षेपणास्त्रांनी क्युबाच्या आकाशात आणखी एक यू-२ पाडले. अमेरिकेने क्युबाची सागरी नाकेबंदी केली. अमेरिकेची ७० बी-५२ बॉम्बफेकी विमाने अण्वस्त्रांसह २४ तास हवेत घिरटय़ा घालत होती. क्युबाकडे जाणाऱ्या रशियाच्या नौका ऐन वेळी मागे फिरल्याने युद्ध टळले.

sachin.diwan@ expressindia.com