सचिन दिवाण

अमेरिकेने १९६० ते १९८० च्या दशकांत विकसित केलेल्या दीर्घ पल्ल्याच्या किंवा आंतरखंडीय क्षेपणास्त्रांमध्ये अ‍ॅटलास, टायटन आणि मिनिटमन या क्षेपणास्त्रांचा प्रामुख्याने समावेश होतो. या क्षेपणास्त्रांनी अमेरिकेला सोव्हिएत युनियनमधील कोणत्याही लक्ष्यावर अण्वस्त्रहल्ला करण्याची क्षमता मिळवून दिली. त्याने दोन्ही देशांच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानातील दरी भरून निघाली. अण्वस्त्रे आणि त्यांना हजारो किलोमीटर दूरवरच्या लक्ष्यापर्यंत वाहून नेण्यासाठी तयार झालेली क्षेपणास्त्रे यांच्यामुळे शीतयुद्ध शिगेला पोहोचले होते.

अमेरिकेने १९५५ साली अ‍ॅटलास आणि टायटन क्षेपणास्त्र विकासाला सुरुवात केली. अ‍ॅटलास क्षेपणास्त्राची ‘डी’ आवृत्ती १९५९ साली तैनात करण्यासाठी तयार झाली. त्याचा पल्ला ८७०० मैल होता आणि त्यावर डब्ल्यू-४९ प्रकारचे १.४४ मेगाटन क्षमतेचे अण्वस्त्र बसवता येत होते. अ‍ॅटलासच्या सुधारित ‘ई’ आणि ‘एफ’ आवृत्तींचा पल्ला तितकाच होता पण त्यांच्यावर डब्ल्यू-३८ प्रकारचे ३.७५ मेगाटनचे अण्वस्त्र बसवता येत असे. ही क्षेपणास्त्रे १९६५ पर्यंत सेवेत राहिली.

टायटन-१ क्षेपणास्त्र १९६१ साली अमेरिकी सेनादलांत सामील झाले. त्याचा पल्ला ६००० मैलांहून अधिक होता आणि त्यावर डब्ल्यू-३८ प्रकारचे ३.७५ मेगाटनचे अण्वस्त्र बसवता येत असे. त्यावेळी ते अमेरिकेच्या ताफ्यातील सर्वात मोठे क्षेपणास्त्र होते. त्याची उंची १०० फूट आणि व्यास १० फूट होता. टायटन-१ क्षेपणास्त्र १९६५ साली सेवेतून निवृत्त करण्यात आले. त्याची जागा टायटन-२ ने घेतली. टायटन-२ चा पल्ला ३१०० मैलांनी वाढवून ९३०० मैल इतका केला होता. त्यावर डब्ल्यू-५३ प्रकारचे ९ मेगाटन क्षमतेचे अण्वस्त्र बसवता येत असे. टायटन-२ चे काही मोठे अपघात झाले. सीरियातील दमास्कस येथे तैनात टायटन-२ क्षेपणास्त्राचा १८ सप्टेंबर १९८० रोजी देखभालीदरम्यान स्फोट झाला. क्षेपणास्त्राच्या इंधनाच्या स्फोटाने भूमिगत बंकरचे ७४० टन वजनाचे पोलादी आणि काँक्रिटचे दार नष्ट झाले आणि क्षेपणास्त्रावरील डब्ल्यू-५४ प्रकारचे अण्वस्त्र हवेत ६०० फूट उंच उडून ३०० यार्डावर जाऊन पडले. अण्वस्त्राचा स्फोट झाला नाही. अशा अपघातांमुळे टायटन-२ च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अमेरिकेने त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था अधिक भक्कम केली. अखेर १९८७ पर्यंत टायटन-२ सेवामुक्त करण्यात आली. त्यानंतर अमेरिकेने द्रवरूप इंधनावर आधारित क्षेपणास्त्रांचा वापर थांबवला. द्रवरूप इंधनावर आधारित क्षेपणास्त्रे हाताळण्यास तितकीशी सोयीस्कर नसतात. त्यांना इंधन भरण्यास वेळ लागतो. तसेच त्यांच्या साठवणुकीवर आणि वाहतुकीवरही मर्यादा येतात. टायटन अग्निबाणाच्या सुधारित आवृत्ती उपग्रह प्रक्षेपणासाठी वापरण्यात आल्या.

sachin.diwan@ expressindia.com