पहिल्या महायुद्धाप्रमाणेच जर्मनी आणि जपानने दुसऱ्या महायुद्धातही पाणबुडय़ांचा मोठय़ा प्रमाणावर आणि घातक वापर केला. प्रामुख्याने अटलांटिक, भूमध्य आणि प्रशांत महासागरांत या लढाया लढल्या गेल्या. पाणबुडय़ांनी व्यापारी जहाजे आणि युद्धनौकांचे अतोनात नुकसान केले. पण नंतर पाणबुडीविरोधी युद्धप्रणाली (अँटी-सबमरीन वॉरफेअर) विकसित होत गेले आणि पारडे फिरले.

युद्धकाळात जर्मन पाणबुडय़ा मुख्यत्वे दोन प्रकारच्या होत्या- किनाऱ्याजवळ कारवाया करणाऱ्या कोस्टल किंवा टाइप-७ आणि खोल समुद्रात कारवाया करणाऱ्या सी-गोइंग किंवा टाइप-९. त्यांचा समुद्राच्या पृष्ठभागावर राहून कारवाया करण्याचा पल्ला अनुक्रमे ५००० आणि ११,००० सागरी मैल होता. त्या मुख्यत्वे डिझेल इंजिनवर चालत आणि पाण्याखाली इलेक्ट्रिक इंजिनचा वापर करत. पण त्यांची पाण्याखाली राहण्याची क्षमता एका वेळी ८० सागरी मैलांपर्यंतच मर्यादित होती. त्यानंतर त्यांना बॅटरी चार्ज करण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागे आणि तेव्हा हवेची गरज लागत असे. वेगही ताशी ४ नॉट्स इतकाच होता. या अडचणीवर मात करण्यासाठी जर्मनीने पाणबुडय़ांवर श्नॉर्केलचा वापर करण्यास सुरुवात केली. या पद्धतीत एक नळी पाण्याबाहेर येत असे आणि त्यातून पाण्याखाली पाणबुडीला हवा मिळत असे. त्यामुळे पाण्याखाली राहण्याची क्षमता वाढली. त्यानंतर जर्मनीने टाइप-२१ आणि टाईप-२३ पाणबुडय़ा वापरात आणल्या. त्या ताशी १७ नॉट्स वेगाने २०० ते ३०० सागरी मैल पाण्याखाली प्रवास करू शकत. जर्मनीत हायड्रोजन पेरॉक्साइडवर चालणाऱ्या इंजिनावरही संशोधन सुरू होते. त्याने पाणबुडय़ांची क्षमता आणखी वाढली असती.

पाणबुडय़ांच्या विकासाबरोबरच त्या शोधून नष्ट करण्याचे तंत्रही विकसित होत होते. सुरुवातीच्या पाणबुडय़ांना बहुतांश वेळ पाण्याच्या पृष्ठभागावरच राहावे लागे. त्यामुळे त्या गस्ती नौका आणि विमानांना सापडत असत. तेव्हा पाणबुडीच्या पृष्ठभागावरही तोफ असे. मग समोरासमोर तोफा डागून आणि गोळीबार करून पाणबुडी नष्ट केली जात असे. शत्रूच्या पाणबुडय़ांचा माग काढण्याचे काम स्वत:च्या पाणबुडय़ा किंवा युद्धनौका करत. त्यांनतर ‘सोनार’ (साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग) आणि ‘रडार’ (रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग) या उपकरणांच्या मदतीने पाणबुडय़ा शोधण्यास मदत होऊ लागली. तसेच जर्मनीकडून गुप्त संदेशवहनासाठी वापरली जाणारी ‘एनिग्मा कोड’ नावाची सांकेतिक लिपी ब्रिटन व मित्रराष्ट्रांनी जाणून घेतली होती. त्यामुळे मित्रराष्ट्रे जर्मनी आणि जपानच्या गुप्त संदेशांची उकल करून त्यांच्या मोहिमांची आगाऊ माहिती मिळवत होती. त्यानंतर डेप्थ चार्ज, हेजहॉग, स्क्विड, टॉर्पेडोसारख्या शस्त्रांनी पाणबुडय़ा नष्ट केल्या जात. हेजहॉग एका वेळी अनेक पाणबुडीविरोधी बॉम्ब डागत असे, तर स्क्विड ही पाणबुडीविरोधी मॉर्टर (तोफ) होती.

सचिन दिवाण

sachin.diwan@ expressindia.com