दुसऱ्या महायुद्धानंतर जगात भांडवलशाही अमेरिका आणि साम्यवादी सोव्हिएत युनियन यांच्या नेत्त्वाखालील देशांचे दोन तट पडले. त्यांनी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो) आणि ‘वॉर्सा पॅक्ट’ अशा लष्करी संघटना उभारल्या. जर्मनीच्या विभागणीनंतर युरोपमध्ये ‘पोलादी  पडदा’ उभा राहिला आणि जगात शीतयुद्ध सुरू झाले. त्यातील पहिली ठिणगी पडली ती कोरियामध्ये १९५० ते १९५३ या काळात झालेल्या युद्धाने. या युद्धात तोफखाना आणि अन्य युद्धसामग्री प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धातीलच होती.

त्यानंतर १९५४ साली व्हिएतनाममधील दिएन-बिएन-फू येथील युद्धात ‘व्हिएत-मिन्ह’चे नेते जनरल वो नुएन जिअ‍ॅप यांच्या नेतृत्वाखालील सेनेने तोफखान्याचा प्रभावी वापर करीत फ्रेंच सेनेला शरण आणले. त्यातून इंडोचायनावरील फ्रेंच सत्ता संपुष्टात आली आणि उत्तर व दक्षिण व्हिएतनाम, कंबोडिया आणि लाओस या देशांची निर्मिती झाली. त्यानंतर काही वर्षांतच व्हिएतनामध्ये पुन्हा युद्ध भडकले.

या काळातील अमेरिकी तोफखान्यात प्रामुख्याने एम १०७ (१७५ मिमी), एम १०९ (१५५ मिमी) आणि एम ११० (२०३ मिमी) या प्रकारच्या तोफांचा समावेश होता. यापैकी एम- १०९ हॉवित्झर तोफ हाय एक्स्प्लोझिव्ह तोफगोळा १८ किमीपर्यंत तर रॉकेट असिस्टेड प्रोपेलंट तोफगोळा ३० किमी अंतरापर्यंत डागू शकत असे.

ब्रिटिशांनी जुन्या २५ पौंडी, ७५ मिमी आणि १०५ मिमी पॅक हॉवित्झर आदी तोफा बदलून त्यांच्या जागी एल-११८ नावाच्या १०५ मिमी व्यासाच्या हॉवित्झर तोफा वापरात आणल्या. एल-११८ तोफ एका मिनिटात ६ ते ८ तोफगोळे  १७ किमी अंतपर्यंत डागू शकत असे.

ब्रिटन, पश्चिम जर्मनी आणि इटलीने संयुक्तरीत्या तयार केलेली एफएच-७० ही १५५ मिमी व्यासाची तोफही ‘नाटो’ सैन्यात वापरात होती. ब्रिटिश व्हिकर्स आणि जर्मन ऱ्हाइनमेटल या कंपन्यांनी तिचे डिझाइन बनवले होते. इटलीने तयार केलेली ओटीओ मेलरा मॉडेल ५६ ही १०५ मिमीची हॉवित्झर तोफ ११ किमीपर्यंत मारा करू शकत असे. ही तोफ साधारण ३० देशांच्या सैन्यात सुमारे ५० वर्षे वापरात होती. फ्रान्सने एयूएफ-१ आणि टीआर १५५ मिमी हॉवित्झर्स बनवल्या होत्या. याशिवाय कॅनडातील जेराल्ड बुल यांच्या स्पेस रिसर्च कॉर्पोरेशन ऑफ कॅनडाने तयार केलेली जीसी-४५ ही तोफही कमी अंतरावरील लक्ष्यांविरुद्ध खूप अचूक होती. चीनने त्याची टाइप-८९ नावाने देशी आवृत्ती तयार केली होती.

सोव्हिएत रशियाने १९५५ साली डी-२० ही १५२ मिमी व्यासाची तोफ तयार केली होती. त्यातून अण्वस्त्रेही डागता येत असत. रशियाने ही तोफ इजिप्त, भारत आणि उत्तर व्हिएतनाम यांना पुरवली होती. रॉकेटच्या मदतीने तिचा तोफगोळा साधारण ३० किमीपर्यंत मारा करू शकत असे. तसेच रशियाची दुसऱ्या महायुद्धातील १५२ मिमी डी-१ ही तोफ १९९० च्या दशकापर्यंत वापरात होती. रशियाने १९५४ साली तयार केलेल्या १३० मिमीच्या एम-४६ या तोफा बदलण्यासाठी १९७८ साली १५२ मिमी एम-१९७६ तोफ वापरात आणली. ती एका मिनिटात ८ तोफगोळे २४.७ किमीपर्यंत डागत असे. १८० मिमी व्यासाची एस-२३ ही शीतयुद्ध काळातील रशियाची सर्वात मोठी ओढून नेण्याची (टोड) तोफ होती. त्यातून ३० ते ४३ किमीपर्यंत पारंपरिक तोफगोळा किंवा अण्वस्त्रे डागता येत. इजिप्तने १९७३ सालच्या योम किप्पूर युद्धात  इस्रायलविरुद्ध ही तोफ वापरली होती.

sachin.diwan@expressindia.com