‘बुलपप’ डिझाइन हा बंदुकांमधील अत्याधुनिक ट्रेंड मानला जातो. या प्रकाराची खासियत म्हणजे बंदुकीची ‘अ‍ॅक्शन’ आणि मॅगझिन तिच्या ट्रिगर ग्रुप व पिस्टल ग्रिपच्या मागे असते. नेहमीच्या बंदुकीत ‘अ‍ॅक्शन’ आणि मॅगझिन तिच्या पिस्टल ग्रिप आणि ट्रिगर ग्रुपच्या पुढील भागात असते. बंदुकांच्या भाषेत ‘अ‍ॅक्शन’ म्हणजे काडतूस भरणे, फायर करणे आणि मोकळे काडतूस बाहेर फेकणे या क्रिया हाताळणारी प्रणाली.

बुलपप डिझाइनचा मुख्य फायदा म्हणजे रायफलच्या बॅरलची लांबी कमी न करता रायफलची एकूण लांबी आणि वजन कमी करता येते. कारण रायफलचे बॅरल तिच्या मुख्य अंगात खूप मागून सुरू होते. बॅरलची लांबी बंदुकीचा पल्ला ठरवण्यात महत्त्वाची असते. बॅरल जितके लांब तितका पल्ला अधिक. रायफलच्या कमी लांबीचा फायदा असा की खंदक किंवा तत्सम अडचणीच्या जागेत बंदूक फिरवून वापरण्यास सोयीची असते. बुलपप रायफलचे वजन तिच्या मागे म्हणजे दस्त्याच्या बाजूला एकवटलेले असते. त्यानेही फारसा जोर न लावता बंदूक सहज फिरवता येते. याशिवाय रायफलचे वजन कमी झाले की सैनिक गोळ्या अधिक वाहून नेऊ शकतात. त्याने युद्धात स्वत:ची जगण्याची आणि शत्रूला मारण्याची शक्यता वाढते. या कारणांमुळे अलीकडे बुलपप डिझाइन लेटेस्ट ट्रेंड बनला आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला काही जणांनी या प्रकाराच्या संकल्पना मांडल्या होत्या. पण खऱ्या अर्थाने बुलपप रायफल म्हणता येईल अशी बंदूक ब्रिटनने १९५०च्या दशकात तयार केली होती. तिचे नाव ‘ईएम-२’ असे होते. ब्रिटिश लष्कर ती स्वीकारण्याच्या बेतातही होते. पण त्या काळात नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनच्या (नाटो) सर्व सदस्य देशांच्या शस्त्रांमध्ये समानता आणण्याचे प्रयत्न सुरू होते. सर्व नाटो देश ७.६२ मिमी व्यासाच्या गोळ्या असलेल्या बंदुका स्वीकारत होते. ईएम-२ मध्ये ७ मिमी व्यासाच्या गोळ्या वापरल्या जात. त्यामुळे तिचा वापर मागे पडला.

त्यानंतर बुलपप डिझाइनवर आधारित असॉल्ट रायफल तयार केली ती १९७०च्या दशकात युरोपमधील ऑस्ट्रिया या देशाने. तिचे नाव श्टायर एयूजी (Steyr AUG – Armee-Universal-Gewehr). त्यात बुलपपच्या सर्व खुबी आहेत. तिच्या बांधणीत प्लास्टिक पॉलिमर्सचा मोठय़ा प्रमाणात वापर केला आहे. ऑस्ट्रियाच्या लष्कराने १९७८ मध्ये श्टायर एयूजी स्वीकारली. तिची एकूण लांबी ३१ इंच असून त्यात २० इंच लांबीचे बॅरल आहे. तिचे मॅगझिन प्रथमच अर्धपारदर्शक प्लास्टिकचे बनवले होते. त्यामुळे किती गोळ्या शिल्लक आहेत ते सैनिकांना सहज पाहता येते. त्यात ५.५६ मिमी व्यासाच्या ३० किंवा ४२ गोळ्या मावतात. त्या मिनिटाला ६५०च्या वेगाने झाडल्या जातात. तिचा पल्ला ४५० ते ५०० मीटर आहे. तिच्या बॅरललाच स्वारोव्हस्कीची दुर्बीण जोडलेली आहे. त्यामुळे बॅरल आणि साइट्सची अलाइनमेंट बिघडत नाही आणि अचूकता कायम राहते. डावखुऱ्या सैनिकांना वापरता यावी म्हणून श्टायरला दोन्ही बाजूंना मोकळी काडतुसे बाहेर फेकण्याची सोय आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आदी देशांनी श्टायर स्वीकारली आहे. ऑस्ट्रेलियाच्या सैन्याने ईस्ट तिमोरसह अफगाणिस्तान आणि इराकमध्ये श्टायर वापरली आहे.

sachin.diwan@expressindia.com