क्रॉसबो हे नेहमीच्या धनुष्यबाणाचेच थोडे सुधारित आणि यांत्रिक रूप. दिसायला काहीसे विचित्र असले तरी हे खूप प्रभावी शस्त्र आहे. आधुनिक काळात बंदुकीच्या शोधानंतर युद्धभूमीवर जो बदल झाला तसाच बदल मध्ययुगात क्रॉसबोमुळे झाला. त्या काळात हे शस्त्र इतके घातक मानले जात होते की ११३९ सालात पोप इनोसंट दुसरे यांनी ख्रिस्ती योद्धय़ांनी अन्य ख्रिश्चनांविरुद्ध क्रॉसबो या शस्त्राचा वापर करण्यावर बंदी घातली होती. अर्थात मुस्लीम आणि येशूवर श्रद्धा नसणाऱ्या अन्य शत्रूंविरुद्ध (इनफिडेल्स) त्याच्या वापराला परवानगी होती.

नेहमीचा धनुष्यबाण हा हजारो वर्षांपासून वापरात असला तरी त्याचा युद्धात परिणामकाररीत्या वापर करण्यासाठी उच्च कोटीची शारीरिक क्षमता आणि वर्षांनुवर्षांचा अभ्यास आणि सराव लागतो. त्यानंतर युद्धाच्या धामधुमीत धावत्या घोडय़ावर किंवा रथात स्वार होऊन दुसऱ्या गतिमान लक्ष्याचा अचून वेध घेणे हे पुढचे दिव्य. त्यामुळे विविध देशांत धनुर्विद्या काही ठरावीक उच्चभ्रू वर्गाकडेच केंद्रित झाली होती. चांगले धनुर्धर पिढीनपिढय़ा एकाच सामाजिक वर्गात तयार होत आणि त्यांना बालपणापासून प्रशिक्षण दिले जायचे. ही व्यवस्था ज्या समाजात उपलब्ध नव्हती तेथे धनुर्विद्येचा फारसा प्रसार झालेला दिसत नाही. मध्ययुगीन इग्लंडमध्ये प्रसिद्ध लाँग-बो वापरणे ही अशीच काही उच्चभ्रू समाजाची मक्तेदारी होती. त्यामुळे ते योद्धे बाळगणे राजासाठी खर्चिक असे.

क्रॉसबोने ही स्थिती बदलली आणि युद्धभूमीवर एक प्रकारे समता आणली. त्यामध्ये धनुष्य एका लाकडी ढांचावर बसवलेला असतो. त्याच्या दोरीत अधिक ताण असतो. ती दोरी खेचण्यासाठी यांत्रिक व्यवस्था असते. त्याचे स्टरअप, पुल अँड पुश लिव्हर्स, विंडलॅस, क्रॅनेक्विन असे प्रकार आहेत. धनुष्याच्या पुढच्या भागात एक कडी असे. ती जमिनीवर टेकवून पायाच्या चवडय़ात अडकवून धरायची आणि प्रत्यंचा यांत्रिक पद्धतीने अन्य दोऱ्या आणि कपीच्या (पुली) साहाय्याने ताणून एका खाचेत अडकवणे आणि त्यानंतर त्याला बाण लावणे अशी रचना असे. नंतर नेम धरून बंदुकीसारखा चाप ओढला की बाण सुटत असे. या बाणांना ‘बोल्ट’ किंवा ‘क्वारल’ म्हणत. ते खूप वेगाने डागले जात. मध्यम अंतरापर्यंत खूप वेगाने बाणांचा मारा करणारे क्रॉसबो हे प्रभावी शस्त्र होते. जवळून मारा केल्यास हे बाण चिलखतही भेदत. ‘क्रुसेड्स’च्या काही युद्धांत ख्रिश्चन योद्धय़ांना क्रॉसबो वापराचा खूपच फायदा मिळाला होता.

क्रॉसबो वापरणे अत्यंत सोपे होते. कोणीही सामान्य सैनिक थोढय़ाशा प्रशिक्षणाने ते तंत्र अवगत करू शकत असे. क्रॉसबो बनवण्याचा खर्चही कमी होता. त्यामुळे राजांना कमी खर्चात जास्त संख्यने धनुर्धर युद्धात उतरवणे शक्य होऊ लागले. तसेच आता क्रॉसबो वापरून सामान्य सैनिक विरोधी पक्षाच्या सरदारांचा वेध घेऊ शकत होता. युद्धभूमीवरील ही समानता विजयासाठी महत्त्वाची होती. मात्र तरीही क्रॉसबोधारकांना त्यांच्या योगदानाचे श्रेय मिळत नसे.

क्रॉसबोमध्ये एक त्रुटी होती. त्याला बाण लावण्यास खूप वेळ लागत असे. त्यामुळे एका मिनिटात क्रॉसबो वापरून एक किंवा दोनच बाण सोडता येत असत. त्याचवेळी लाँगबोमधून साधारण दहा बाण डागले गेलेले असत. या फरकामुळे २५ ऑक्टोबर १४१५ रोजी फ्रान्समधील अजिनकोर्टच्या लढाईत ब्रिटिश लाँगबोधारकांनी फ्रेंच क्रॉसबोधारकांवर मात केली. ‘हंड्रेड इयर्स वॉर’मधील ब्रिटिशांचा तो पहिला महत्त्वाचा विजय होता आणि तेथूनच ब्रिटिश साम्राज्याला ऊर्जितावस्था आली. पुढे बंदुकीच्या शोधानंतर सर्वच धनुष्यबाणांचे दिवस भरले.

सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com