हवेत सरळ रेषेत वर उड्डाण घेण्याची मानवाची अनेक शतकांपासूनची इच्छा हेलिकॉप्टरच्या रूपाने पूर्ण झाली. हेलिकॉप्टर हा शब्द ‘हेली’ (म्हणजे बाकदार, वळलेले) आणि ‘टेरॉन’ (पंख) या ग्रीक शब्दांच्या मिलाफातून तयार झाला आहे. चीनमध्ये साधारण ११व्या ते १२व्या शतकापासून भोवऱ्यासारखे हाताने फिरवून दोन वाकवलेल्या पंखांच्या मदतीने हवेत सरळ उडणारे खेळणे (फ्लाइंग काइट) वापरात होते. लिओनार्दो-द-विन्ची यांनी १५व्या शतकात हेलिकॉप्टरचे कल्पनाचित्र तयार केले होते. त्यानंतर १८व्या आणि १९व्या शतकात अनेक संशोधकांनी हवेत थेट उड्डाणाचे प्रयत्न केले. फ्रेंच तंत्रज्ञ पॉल कोर्नू यांनी १३ नोव्हेंबर १९०७ रोजी हेलिकॉप्टरचे पहिले यशस्वी उड्डाण केले.

विमानाच्या तुलनेत हेलिकॉप्टरचा विकास थोडा कमी गतीने झाला असला, तरीही आज हेलिकॉप्टर हे एक अत्यंग प्रगत, भरवशाचे आणि बहुउद्देशीय वाहन म्हणून विकसित झाले आहे. त्यात जुआन डी ला सिएव्‍‌र्हा, इगोर सिकोस्र्की, आर्थर यंग, फ्रँक पियासेकी अशा अनेकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी हेलिकॉप्टरसारख्या मूलत: अस्थिर यंत्रावर नियंत्रण ठेवून त्याला खात्रीशीर वापर करण्यास लायक बनवले. हेलिकॉप्टरच्या फिरत्या पंखांपासून (रोटर) त्याला हवेत उचलू शकेल इतकी शक्ती मिळवण्याचे मोठे आव्हान होते. पिस्टन इंजिन आणि त्यानंतर टबरेशाफ्ट इंजिनांचा विकास झाल्यावर हेलिकॉप्टरला हवेत सरळ उड्डाण करण्याची शक्ती मिळाली.

दुसऱ्या महायुद्धापर्यंत हेलिकॉप्टर प्रायोगिक तत्त्वावर विकसित केली जात होती आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर खूपच मर्यादित होता. नाझी जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात फॉक-अगेलीस एफए-२२३ ड्राक (ड्रॅगन), फ्लेटनर एफए-३३० बाखश्टील्झ, फ्लेटनर एफए-२८२ कॉलिब्री ही हेलिकॉप्टर वापरली. तर अमेरिकेने सिकोस्र्की आर-४ ही हेलिकॉप्टर वापरली. त्यांचा वापर प्रामुख्याने हवाई टेहळणीसाठी झाला.

कोरियन युद्धात (१९५० ते १९५३) हेलिकॉप्टरचा बराच विकास झाला होता आणि ते एक भरवशाचे यंत्र म्हणून वापरता येऊ लागले होते. कोरियन युद्धात अमेरिकेची सिकोस्र्की एफ-५, एफ-१९, बेल एफ-१३ आणि हिलर एफ-२३ या प्रकारची हेलिकॉप्टर प्रामुख्याने जखमी सैनिकांना आघाडीवरून परत आणणे, माफक प्रमाणात रसदपुरवठा करणे अशा कामांसाठी वापरली गेली. अरब आणि इस्रायल यांच्यातील १९५६ सालच्या सुएझ युद्धात प्रथमच हेलिकॉप्टरचा लढाऊ भूमिकेत वापर झाला. ब्रिटिश ‘जॉइंट एक्स्परिमेंटल हेलिकॉप्टर युनिट’ (जेहू) मधील वेस्टलँड व्हर्लविंड आणि ब्रिस्टॉल सायकॅमोअर हेलिकॉप्टरनी या युद्धात कमांडोंना आघाडीवर उतरवले. विमानाच्या तुलनेत हेलिकॉप्टरचे अनेक फायदे आहेत. विमाने अधिक उंचीवरून आणि अधिक वेगाने उडतात. त्यामुळे त्यांना लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो. तसेच त्यांना मोठय़ा धावपट्टय़ा लागतात. हेलिकॉप्टर कमी जागेतून उड्डाण करू शकते. मागे, पुढे, बाजूला अशा दिशांना उडू शकते. लक्ष्यावर स्थिर राहून घोंघावू (हॉवर) शकते. त्यामुळे ते युद्धात अत्यंत प्रभावी ठरते.

sachin.diwan@expressindia.com