भारताने १९८० च्या दशकात स्वीडनच्या बोफोर्स कंपनीकडून १५५ मिमी व्यासाच्या हॉवित्झर प्रकारच्या तोफा खरेदी केल्या. त्या व्यवहारात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यानंतर आजवर भारतीय सैन्यात नव्या तोफा दाखल नव्हत्या. अखेर २०१८ साली अमेरिकेकडून एम-७७७ आणि दक्षिण कोरियाकडून के-९ वज्र या तोफा खरेदी करण्यास सुरुवात झाली.

दरम्यान भारतीय तोफखान्याला आधुनिक तोफांची कमतरता जाणवत होती. बोफोर्स तोफांनी १९९९ साली कारगिल युद्धात उपयुक्तता सिद्ध केली होती. त्यांची स्वदेशी आवृत्ती बनवण्याच्या प्रयत्नांतून धनुष ही तोफ आकारास आली. ऑर्डनन्स फॅक्टरीज बोर्डाच्या (ओएफबी) गन कॅरेज फॅक्टरीने २०१० सालानंतर धनुषची रचना आणि निर्मिती केली. धनुष ही तोफ मूळ बोफोर्स हॉबिट्झ एफएच-७७-बी या स्वीडिश तोफेवर आधारित आहे. मूळ तोफेप्रमाणेच धनुषही हॉवित्झर प्रकारची तोफ आहे. म्हणजे तिचे तोफगोळे जमिनीला समांतर नव्हे तर वक्राकार मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे हॉवित्झर पर्वतमय प्रदेशात प्रभावी ठरतात. मूळ बोफोर्स एफएच-७७-बी तोफेचा व्यास १५५ मिमी आणि लांबी ३९ कॅलिबर (म्हणजे व्यासाच्या ३९ पट) आहे. धनुषच्या नळीचा (बॅरल) व्यास १५५ मिमी असला तरी तिची लांबी ४५ कॅलिबर (म्हणजे व्यासाच्या ४५ पट) आहे. त्यामुळे धनुषचा पल्ला, अचूकता आदी गुणधर्मात २० ते २५ टक्के सुधारणा झाली आहे. मूळ बोफोर्सचा पल्ला २७ ते ३० किमी आहे. तर धनुषचा पल्ला ३८ किमीपर्यंत आहे. तसेच तिच्यात अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणांचा समावेश केला आहे. धनुष टोड हॉवित्झर प्रकारची तोफ आहे. म्हणजे तिला अन्य वाहनाने ओढून (टो करून) न्यावे लागते. धनुषच्या २०१६ ते २०१८ दरम्यान विविध वातावरणात कठोर चाचण्या घेतल्यानंतर आता तिच्या उत्पादनाला आणि सैन्यात दाखल करण्याला हिरवा कंदील मिळाला आहे. सध्या धनुषमधील ८१ टक्के भाग स्वदेशी बनावटीचे आहेत. पुढील वर्षी हे प्रमाण ९० टक्क्य़ांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. भारतीय सैन्यात २०१७ साली १८, २०१८ साली ३६ आणि २०१९ साली ६० अशा प्रकारे एकूण ११४ धनुष तोफा दाखल होणार आहेत. सध्या एका धनुष तोफेची किंमत १४.५० कोटी रुपये आणि तिच्या एका तोफगोळ्याची किंमत १ लाख रुपये आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था  (डीआरडीओ) अ‍ॅडव्हान्स्ड टोड आर्टिलरी गन सिस्टिम (एटीएजीएस) नावाची हॉवित्झर तोफ विकसित करत आहे. ही तोफदेखिल मूळ बोफोर्स तोफेवरच आधारित आहे. तिचा व्यास १५५ मिमी आणि लांबी ५२ कॅलिबर  (व्यासाच्या ५२ पट) आहे. त्यामुळे तिचा पल्ला ४० किमीपर्यंत वाढला आहे. या तोफेने २०१७ साली चाचण्यांदरम्यान ४७.२ किमीवर तोफगोळा डागून १५५ मिमी व्यासाच्या तोफेसाठी पल्ल्याचा उच्चांक प्रस्थापित केला. या प्रकल्पात डीआरडीओ, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट (एआरडीई), ऑर्डनन्स फॅक्टरीज बोर्ड, कल्याणी उद्योगसमूह आणि टाटा पॉवर यांची भागीदारी आहे. या तोफेच्या अद्याप चाचण्या सुरू आहेत.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com