सोव्हिएत युनियनने १९६०च्या दशकात विकसित केलेले मिल एमआय-८ हे हेलिकॉप्टर वाहतूक आणि काही प्रमाणात लढाऊ हेलिकॉप्टर म्हणून वापरले जाते. मजबूत बांधणी, देखभाल आणि दुरुस्तीसाठी सोपे आणि किफायतशीर असलेले एमआय-८ हे जगातील सर्वाधिक उत्पादन झालेले हेलिकॉप्टर मानले जाते. विविध आवृत्तींमधील ११,००० एमआय-८ हेलिकॉप्टर्सचे आजवर उत्पादन झाले आहे. जगातील साधारण ५० देशांच्या हवाई दलांमध्ये त्यांचा वापर होत आहे. त्याची सुधारित एमआय-१७ ही आवृत्तीही तितकीच गाजली. भारतीय हवाई दलातही ही दोन्ही हेलिकॉप्टर प्रामुख्याने वापरात आहेत.

सोव्हिएत युनियनची बहुतांश हेलिकॉप्टर ही पाश्चिमात्य देशांच्या हेलिकॉप्टरची नक्कल करून बनवलेली दुय्यम दर्जाची असतात असा गैरसमज अस्तित्वात होता. मात्र एमआय-८ हे हेलिकॉप्टर सर्वप्रथम जाहीररीत्या प्रदर्शित करण्यात आले तेव्हा या समजाला कायमची मूठमाती देण्यात आली. हे हेलिकॉप्टर सोव्हिएत तांत्रिक क्षमता सिद्ध करणारे होते. यापूर्वीच्या एमआय-४ या होलिकॉप्टरच्या ऐवजी वारण्यासाठी एमआय-८चा विकास करण्यात आला होता. त्याचे व्ही-८ नावाचे प्रारूप एकाच इंजिनावर चालणारे होते. मात्र सोव्हिएत सेनादले आणि नागरी हवाई वाहतूक खात्यालाही अधिक विश्वासार्हता आणि सुरक्षिततेसाठी दोन इंजिनांचे हेलिकॉप्टर हवे होते. त्यानंतर त्याच्या रचनेत बदल करून दोन टबरेशाफ्ट इंजिनांवर आधारित हेलिकॉप्टरचे प्रथम १७ सप्टेंबर १९६२ रोजी यशस्वी उड्डाण झाले. त्यानंतर त्यात अधिक सुधारणा करत १९६५ साली एमआय-८ वापरास तयार झाले. एमआय-८ हेलिकॉप्टर १९६५ साली पॅरिस एअर शोमध्ये प्रदर्शित करण्यात आले आणि लगेचच त्याला निर्यातीसाठी मागणी येऊ लागली. सोव्हिएत हवाई दलात एमआय-८ १९६७ साली दाखल झाले.

एमआय-८ हेलिकॉप्टर ताशी कमाल २५० किमी वेगाने एका दमात ५०० किमीपर्यंत मजल मारू शकते. ते कमाल ४५०० मीटर (१५,००० फूट) उंचीवर कार्यरत राहू शकते. ते १२ स्ट्रेचर किंवा सशस्त्र सैनिक आणि ५००० किलोहून अधिक वजनाचे सामान वाहून नेऊ शकते. त्यावर मशीनगन, रॉकेट्स आणि रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे बसवून लढाऊ भूमिकेत वापर करता येतो. त्याची एमआय-१७ ही सुधारित आवृत्ती ३६ सैनिक वाहून नेऊ शकते.

अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत फौजांची मुख्य भिस्त याच हेलिकॉप्टर्सवर होती. त्यासह चेचेन्या, भारत-पाकिस्तान, इराण-इराक, अरब-इस्रायल संघर्ष, १९९१चे आखाती युद्ध आदींमध्ये त्यांचा वापर झाला.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com