बोइंग सीएच-४७ चिनुक हे अमेरिकी सैन्यदलांच्या ताफ्यातील अवजड मालवाहू हेलिकॉप्टर आहे. मागे आणि पुढील अशा दोन्ही बाजूंना असलेले आणि एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरणारे त्याचे दोन मोठे रोटर (पंखे) हे त्याचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे ते सहज ओळखता येते.

अमेरिकी सैन्य दलांना १९५६ साली जुन्या सिकोस्र्की सीएच-३७ ही मालवाहू हेलिकॉप्टर बदलण्यासाठी नवे हेलिकॉप्टर हवे होते. बऱ्याच विचारविनिमयानंतर व्हटरेल मॉडेल ११४ किंवा वायएचसी-१बी नावाचे हेलिकॉप्टर स्वीकारण्याचे ठरले. या हेलिकॉप्टरचे पहिले उड्डाण २१ सप्टेंबर १९६१ रोजी झाले. व्हटरेल ही कंपनी १९६२ साली बोइंगने खरेदी केली. त्यानंतर या हेलिकॉप्टरचे नाव बोइंग सीएच-४७ ए चिनुक असे ठेवले गेले. ते ऑगस्ट १९६२ मध्ये अमेरिकी सैन्य दलांत दाखल झाले. त्यानंतर आजतागायत ४० वर्षांहून अधिक काळ ते १७ देशांच्या हवाई दलांत प्रभावीपणे कार्यरत आहे.

टॅण्डम रोटर हे बोइंग सीएच-४७ चिनुक हेलिकॉप्टरचे मुख्य वैशिष्टय़. त्यावर दोन टोकांना दोन मोठे पंखे आहेत. ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरतात. त्यामुळे एका रोटरने तयार होणारा टॉर्क दुसऱ्या रोटरने नाहीसा होतो. म्हणजेच पंख एका दिशेने फिरू लागला की हेलिकॉप्टर दुसऱ्या दिशेने गोलाकार फिरू लागते. हा परिणाम (टॉर्क) नाहीसा करण्यासाठी सामान्य हेलिकॉप्टरला शेपटाकडे लहान, उभा रोटर असतो. त्याची चिनुकमध्ये गरज नाही. त्यामुळे चिनुकला उड्डाणादरम्यान असाधारण स्थैर्य लाभते. परिणामी खराब हवामानात जिथे अन्य हेलिकॉप्टर वापरता येत नाहीत तिथे चिनुक वापरता येते.

त्याचे प्रशस्त फ्युजलाज आणि मागील भागातील विस्तृत दरवाजामुळे त्यात अवजड लष्करी वाहनेही भरून वाहून नेता येतात. त्याच्या तळाला तीन हूक असून त्याला टांगून तोफा, चिलखती वाहने, जीप आदी वाहून नेता येतात. त्याचे रिकामे असताना वजन १०,६१५ किलो तर भरल्यानंतरचे वजन २२,६८० किलो असते. ते ताशी २६९ किमी वेगाने १२०० किमी अंतराचा प्रवास करू शकते. व्हिएतनाम, अफगाणिस्तान, इराक आदी लष्करी कारवायांमध्ये त्याचा वापर करण्यात आला. अमेरिकेसह अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, इराण, ग्रीस, इटली, जपान, स्पेन आदी देशांकडे चिनुक आहेत.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com