अमेरिकेच्या सैन्यदलांना १९७०च्या दशकात वापरात असलेली बेल यूएच-१ इरोक्वाय ह्य़ई ही हेलिकॉप्टर बदलण्यासाठी मध्यम क्षमतेच्या वाहतूक हेलिकॉप्टरची गरज होती. नवे हेलिकॉप्टर पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली, खात्रीलायक आणि शत्रूच्या माऱ्यातून वाचण्याची जास्त क्षमता असलेले हवे होते. त्यातून सिकोस्र्की यूएच-६० ब्लॅक हॉक या हेलिकॉप्टरची निर्मिती झाली. ते १९७९ मध्ये अमेरिकी सैन्यदलांत सामील झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकी सैन्यदलांना हे हेलिकॉप्टर काही भाग सुटे करून सी-१३० हक्र्युलस विमानातून वाहून नेता येण्याजोगे हवे होते. त्यामुळे त्याची रचना लांब आणि उंचीला थोडी कमी (बसकी) आहे. हे हेलिकॉप्टर प्रामुख्याने रसदपुरवठा आणि मालवाहतुकीसाठी तयार केले आहे. पण त्यात काही बदल करून ते माफक प्रमाणात लढाऊ भूमिकेतही वापरता येते. ते ताशी २९४ किमी वेगाने प्रवास करू शकते आणि ५९० किमी त्रिज्येच्या प्रदेशात प्रभावीपणे लढू शकते. ते युद्धभूमीवर एका खेपेत ११ सशस्त्र सैनिक किंवा एक १५५ मिमी व्यासाची एम-११९ हॉवित्झर तोफ, तिचे ३० तोफगोळे आणि चार  कर्मचारी वाहून नेऊ शकते. या हेलिकॉप्टरवर मशीनगन, बॉम्ब, रॉकेट्स यासह हेलफायर आणि स्टिंगर क्षेपणास्त्रे बसवता येतात.

अमेरिकेसह २५हून अधिक देशांच्या हवाई दलांत ब्लॅक हॉकच्या विविध आवृत्ती वापरात आहेत. अमेरिकेने १९८३ साली ग्रेनेडातील आणि १९८९ साली पनामा येथील आक्रमणात ही हेलिकॉप्टर्स वापरली. मात्र त्यांचा सर्वात मोठय़ा प्रमाणावर वापर झाला तो १९९१ साली इराकवरील आक्रमणात. त्या युद्धात ब्लॅक हॉकनी हजारो सैनिकांना युद्धभूमीवर वाहून नेले. त्यानंतर १९९३ साली सोमालियातील मोगादिशू येथील हल्ल्यातह ब्लॅकहॉकचा व्यापक वापर झाला. त्यानंतर अफगाणिस्तान आणि २००३ साली इराकमधील कारवाईतही ब्लॅक हॉकने अमेरिकी सैन्याची साथ दिली. मे २०११ मध्ये दहशतवादी ओसामा बिन लादेनविरुद्ध हल्ल्यातही त्यांचा वापर झाला. रिडले स्कॉट यांनी दिग्दर्शित केलेला ‘ब्लॅक हॉक डाऊन’ हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला. त्याला ऑस्कर पुरस्कारही मिळाला. तो चित्रपट मार्क बाऊडेन यांच्या ‘ब्लॅक हॉक डाऊन’ या पुस्तकावर आधारित आहे. त्यात सोमालियातील मोगादिशू येथील संघर्षांत ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सची भूमिका चित्रित करण्यात आली आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com

मराठीतील सर्व गाथा शस्त्रांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different types of weapons part
First published on: 21-09-2018 at 01:24 IST