इराक आणि अफगाणिस्तान येथील अमेरिकेच्या लष्करी कारवायांमुळे सामान्य लोकांनाही आता ड्रोन हा शब्द माहिती झाला आहे. तालिबान आणि अल-कायदाचे अनेक दहशतवादी म्होरके ड्रोन हल्ल्यांत टिपले गेल्याने त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेचे प्रिडेटर, रीपर, ग्लोबल हॉक, ग्रे ईगल आदी ड्रोन प्रसिद्ध आहेत. इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सीरिया, येमेन, लिबिया, बोस्निया, सर्बिया, सोमालिया आदी ठिकाणच्या संघर्षांत हे ड्रोन प्रभावीपणे वापरले गेले आहेत. ते प्रामुख्याने टेहळणी आणि माफक प्रमाणात क्षेपणास्त्र हल्लेही करू शकतात.

प्रिडेटर, रीपर आणि ग्लोबल हॉक हे ड्रोन अमेरिकेने १९८० आणि १९९० च्या दशकांत विकसित केले. त्यांच्या निर्मितीत हलके आणि टिकाऊ मिश्रधातू, कॉम्पोझिट मटेरिअल आदींचा वापर केला आहे. जमिनीवरील नियंत्रण कक्षाकडून ते दूरनियंत्रण (रिमोट कंट्रोल) पद्धतीने चालवले जातात. त्यावर अत्याधुनिक रडार, संवेदक, कॅमेरे आदी बसवलेले आहेत. त्यांनी शत्रू प्रदेशाचे उच्च दर्जाचे छायाचित्रण करता येते. तसेच हेलफायर, स्टिंगर, ग्रिफिन आदी क्षेपणास्त्रे बसवून हल्ल्यासाठीही वापर करता येतो.

प्रिडेटर ताशी २१७ किमी वेगाने, १२०० किमी अंतरापर्यंत, २५,००० फूट उंचीवरून सलग २४ तास टेहळणी करू शकते. रीपर ही प्रिडेटरची सुधारित आणि अधिक शक्तिशाली आवृत्ती आहे. रीपर ड्रोन प्रामुख्याने हवाई हल्ल्यासाठी (हंटर-किलर) तयार केला आहे. ग्लोबल हॉक हा अ‍ॅलिसन रोल्स-रॉइस टबरेफॅन जेट इंजिनावर चालणारा अत्याधुनिक ड्रोन आहे. ग्लोबल हॉक त्यावरील सिंथेटिक अ‍ॅपर्चर रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल, इन्फ्रारेड सेन्सर्सच्या मदतीने एका दिवसात १ लाख चौरस किलोमीटरचा (दक्षिण कोरियाच्या आकाराचा) प्रदेश पिंजून काढू शकतो. ग्लोबल हॉक ड्रोन नॉरथ्रॉप ग्रुमान कंपनीने विकसित केला असून ट्रायटन ही त्याची सागरी टेहळणी आवृत्ती आहे.

इराक, अफगाणिस्तान, लिबिया या देशांत आता हवाई दलाचे फारसे अस्तित्व उरलेले नाही. त्यांची रडार आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा अस्तित्वात नाही किंवा फारशी प्रभावी राहिलेली नाही. या ठिकाणी अमेरिकेचे हवाई प्रभुत्व यापूर्वीच स्थापित झाले आहे. तेथील आकाशात त्यांना कोणी तगडा प्रतिस्पर्धी नाही. अशा ठिकाणी ड्रोन वापरास अनुकूल वातावरण आहे. अन्यथा शत्रूचे हवाईदल आणि हवाई सुरक्षा यंत्रणा (रडार, विमानवेधी तोफखाना आणि क्षेपणास्त्रे) शक्तिशाली असेल तर त्या ठिकाणी ड्रोनचा निभाव लागणे शक्य नाही.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com