शस्त्रास्त्रांची संहारकता वाढवण्यासाठी अनेक प्रकारांनी प्रयत्न केले गेले. त्यात अधिकाधिक प्रदेशात विध्वंस घडवणे हे प्रमुख उद्दिष्ट असते. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून क्लस्टर बॉम्ब किंवा क्लस्टर म्युनिशन्स विकसित करण्यात आले.

क्लस्टर म्हणजे अनेक वस्तूंचा समूह, पुंजका, गुच्छ, घोस किंवा ढीग. क्लस्टर बॉम्बमध्ये एक मोठा मुख्य बॉम्ब असतो. त्याला मदर बॉम्ब म्हणतात. त्याच्या आत अनेक लहान बॉम्ब भरलेले असतात. त्यांना बॉम्बलेट्स म्हणतात. सामान्यत: विमानातून किंवा तोफेतून क्लस्टर बॉम्ब जमिनीवर टाकला जातो. जमिनीपासून काही उंचीवर असताना त्याचे आवरण फुटून त्यातून लहान बॉम्ब बाहेर पडतात आणि विस्तृत प्रदेशात पसरतात. त्यांचा एकाच वेळी किंवा काही काळानंतर स्फोट घडवता येतो. आतील लहान बॉम्बच्या पेरूसारख्या आकारावरून क्लस्टर बॉम्बला ग्वावा बॉम्बही म्हटले जाते.

जर्मनीने दुसऱ्या महायुद्धात प्रथम क्लस्टर बॉम्ब वापरल्याचे मानले जाते. विमानातून टाकण्यात येणारे हे बॉम्ब जमिनीपासून काही अंतरावर वेगळे होऊन त्याचे दोन पंखांसारखे आवरण उघडत असे. हे आवरण बॉम्बला हवेतील प्रवासात स्थैर्य देत असे. त्याच्या पंखांसारख्या आकारामुळे या बॉम्बला बटरफ्लाय बॉम्ब म्हटले जात असे. त्यानंतर अमेरिका, रशिया आणि अन्य देशांनीही वेगवेगळ्या प्रकारचे क्लस्टर बॉम्ब विकसित केले.

क्लस्टर बॉम्बमधील लहान बॉम्ब वेगवेगळ्या कामांसाठी वापरले जातात. त्यात सैनिक किंवा लष्करी वाहनांविरोधी सुरुंग पसरणे, विमानांच्या धावपट्टय़ा उद्ध्वस्त करणे, रणगाडे किंवा लष्करी वाहने नष्ट करणे, रासायनिक अस्त्रे सोडणे, शत्रूची विद्युतवहन यंत्रणा नष्ट करणे आदी बाबींचा समावेश होतो. या प्रत्येक कामासाठी मुख्य बॉम्बच्या आतील लहान बॉम्बची रचना थोडी बदलावी लागते. त्यांना विस्तृत प्रदेशात पसरवण्यासाठी पंखांसारखे भाग जोडलेले असतात. विद्युतपुरवठाविरोधी बॉम्बमधून विद्युतप्रवाही तारा बाहेर पडून त्या विद्युत तारांवर पसरतात. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन विद्युत यंत्रणा बंद पडते. सर्बियातील युद्धात असा हल्ला केला गेला होता.

इस्रायलने १९६७ सालच्या अरब-इस्रायल युद्धात (सिक्स डे वॉर) डिबर बॉम्ब नावाचे क्लस्टर बॉम्ब इजिप्तच्या विमानांच्या धावपट्टय़ा उद्ध्वस्त करण्यासाठी वापरले. डिबर म्हणजे डिबलर म्हणजे धान्याची पेरणी करताना शेतात लहान भोक पाडण्यासाठी वापरले जाणारे छोटे टोकदार हत्यार. १९९१ साली इराकविरुद्धच्या हल्ल्यात (ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म) फ्रान्सच्या मात्रा कंपनीने तयार केलेल्या डय़ुरँडल नावाचा बॉम्ब वापरला होता. हे बॉम्ब रनवे पेन्रिटेटर या प्रकारात येतात.

क्लस्टर बॉम्ब विस्तृत प्रदेशात पसरून त्यांनी सामान्य नागरिकांचाही मृत्यू होऊ शकतो. तसेत त्यातून पसरलेले सुरुंग प्रदीर्घ काळ जागृत राहून नागरिकांना धोका संभवतो. त्यामुळे त्यांच्या वापरावर २००८ सालच्या ‘कन्व्हेन्शन ऑन क्लस्टर म्युनिशन्स’ अनुसार बंदी घातली आहे.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com