अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१७ साली अमेरिकेचा सर्वात मोठा पारंपरिक बॉम्ब युद्धात वापरण्यास परवानगी दिली. इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेच्या अफगाणिस्तानमधील नंगरहार येथील गुहेतील तळावर अमेरिकी हवाईदलाने १३ एप्रिल २०१७ रोजी ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्ज’ म्हणून ओळखला गेलेला हा बॉम्ब टाकला. त्याच्या स्फोटात गुहांचे बऱ्याच व्यापक प्रदेशातील जाळे नष्ट झाले आणि ४ म्होरक्यांसह ९४ दहशतवादी मारले गेले, असा दावा अमेरिकेने केला.

अमेरिकी शस्त्रागारातील हा पारंपरिक स्फोटके असलेला सर्वात मोठा बॉम्ब होता. तो ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्ज’ (एमओएबी) म्हणून ओळखला जात असला तरी त्याच्या नावातील ‘एमओएबी’ या इंग्रजी अक्षरांचे विस्तारित रूप ‘मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट’ असे आहे. त्याला ‘जीबीयू-४३/बी’ असेही म्हणतात. त्याचे वजन ९८०० किलो, लांबी ३० फूट आणि व्यास ४०.५ इंच होता.

या बॉम्बमध्ये ‘एच-६’ नावाचे पारंपरिक स्फोटक भरले होते. ‘एच-६’ हे स्फोटक आरडीएक्स आणि टीएनटी (ट्रायनायट्रोटोल्युन) ही पारंपरिक स्फोटके, अ‍ॅल्युमिनियमची भुकटी, पॅराफिन मेण आणि कॅल्शियम क्लोराइड यांच्या मिश्रणातून बनवतात.

हा बॉम्ब इतका मोठा होता की त्याला विमानाच्या पंखाखाली बसवणे अवघड होते. त्यामुळे तो                    सी-१३० हक्र्यलस या मालवाहू विमानातून लक्ष्यापर्यंत वाहून नेण्यात आला. विमानातील रेल्वे रुळांसारख्या सांगाडय़ावरून त्याला खाली ढकलण्यात आले. त्याला हवेत स्थिर करण्यासाठी चार मोठे कल्ल्यांसारखे पंख (फिन) बसवले होते. बॉम्बच्या स्फोटाची तीव्रता वाढवण्यासाठी त्याचा स्फोट जमिनीपासून काही अंतरावर हवेत घडवून आणण्यात आला. त्यामुळे स्फोटाची ऊर्जा अधिक व्यापक प्रदेशात पसरली.

या बॉम्बची पहिली चाचणी फ्लोरिडातील एग्लिन  हवाई तळावर ११ मार्च २००३ रोजी घेण्यात आली होती. त्यावेळी त्यात ट्रायटोनल हे स्फोटक वापरले होते. ‘एमओएबी’चा विकास व्हिएतनाम युद्धाच्या  काळातील ‘डेझी कटर’ या बॉम्बवरून केला होता. त्याचे नाव ‘बीएलयू-८२’ असे होते. त्याच्या स्फोटाने व्हिएतनामच्या जंगलातील बरीच मोठी जागा रिकामी होत असे. तेथे अमेरिकी हेलिकॉप्टर उतरवता येत असत. मोठय़ा प्रमाणात झाडे नष्ट करण्याच्या क्षमतेमुळे त्या बॉम्बला ‘डेझी कटर’ म्हणत. ते बॉम्ब अफगाणिस्तान युद्धातही वापरले गेले. रशियानेही अशाच प्रकारचा महाकाय बॉम्ब विकसित केला असून त्याला ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब्ज’ म्हटले जाते.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com