पहिल्या महायुद्धापूर्वी जर्मनीत रासायनिक उद्योग मोठय़ा प्रमाणात वाढला होता. त्यातून अनेक उपयोगी रसायनांबरोबरच विषारी रसायनेही तयार होत होती. अनेक देशांनी रासायनिक अस्त्रे तयार केली होती. त्यांच्या वापरामुळे पहिल्या महायुद्धात एकूण दहा लाख सैनिक जखमी झाले, तर ९०,००० सैनिकांचा मृत्यू झाला. या अस्त्रांचा भयानक परिणाम पाहून त्यांची गणती अमानवी अस्त्रे अशी केली गेली आणि त्यांचा वापर रोखण्यासाठी १९२५ साली लीग ऑफ नेशन्सच्या पुढाकाराने जीनिवा प्रोटोकॉल नावाचा करार करण्यात आला. तरीही अनेक देशांनी या अस्त्रांची निर्मिती आणि वापर सुरूच ठेवला.

माणसे, जनावरे आणि वनस्पती अशा सजीवांना मारण्यासाठी किंवा हानी पोहोचवण्यासाठी वापरलेली विषारी रसायने म्हणजे रासायनिक अस्त्रे. ती घन, द्रव किंवा वायू अशा तीनही रूपांत वापरता येतात.

विषारी रसायने अनेक असली तरी त्यातील खूप कमी रसायनांचा युद्धात रासायनिक अस्त्र म्हणून वापर होऊ  शकतो. त्यासाठी रसायन बनवण्यास आणि हाताळण्यास सोपे आणि सोयीचे असावे लागते. तसेच ते वातावरणात स्थिर असले पाहिजे. म्हणजेच वातावरणातील ऑक्सिजन आणि पाण्याशी संयोग येऊन त्याचा परिणाम कमी होता कामा नये. तोफगोळे, क्षेपणास्त्रे किंवा विमानातून डागताना तोफगोळ्यांच्या स्फोटाच्या उष्णतेतही त्याची परिणामकारकता कमी होता कामा नये.

रासायनिक किंवा जैविक अस्त्रे हवा, पाणी आदी मार्गाने पसरवता येतात. त्यांचा लक्ष्याशी म्हणजे सजीवांशी पुरेशा प्रमाणात संपर्क येणे आवश्यक असते. त्यामुळे ती त्वचा, डोळे, श्वसनमार्ग, अन्नमार्ग यातून शरीरात प्रवेश करू शकतात. ती प्रत्यक्ष लक्ष्याच्या जवळ जाऊन वापरली तर त्याला ‘स्टँड-ऑन’ पद्धत आणि लक्ष्यावर लांबून सोडली तर ‘स्टँड-ऑफ’ पद्धत म्हणतात.

रासायनिक अस्त्रांचे त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे अनेक प्रकार आहेत. क्लोरिन, फॉस्जिन, डायफॉस्जिन, क्लोरोपिक्रीन ही गुदमरवणारी (चोकिंग) रसायने आहेत. सल्फर मस्टर्ड (मस्टर्ड गॅस किंवा लेवीसाइट), नायट्रोजन मस्टर्ड, फॉस्जिन ऑक्झाइम, फिनिलडायक्लोरार्सिन ही शरीराचा दाह करणारी रसायने (ब्लिस्टर एजंट्स) आहेत. हायड्रोजन सायनाइड आणि सायनोजेन क्लोराइडसारखी रसायने वायूरूपात पसरवली जातात आणि शरीरात गेल्यावर ती रक्तातील तांबडय़ा पेशींना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा रोखतात. त्यामुळे मृत्यू येतो. या रसायनांना ब्लड एजंट्स म्हणतात.

नव्‍‌र्ह एजंट्स प्रकारची रासायनिक अस्त्रे सर्वात घातक मानली जातात. ती शरीराच्या चेतासंस्थेवर आघात करून जीव घेतात. जर्मनीने १९३०च्या दशकात टॅब्यून, सरीन, सोमन यांसारखे नव्‍‌र्ह एजंट्स तयार केले. ब्रिटनने १९५२ साली ‘व्हीएक्स’ नावाचा घातक नव्‍‌र्ह एजंट तयार केला. बीझेड, एलएसडी, मेस्कलाइन यांसारखी रसायने शरीराला विचार, हालचाली करण्यास अक्षम बनवतात. त्यांना इनकपॅसिटंट्स म्हणतात. अश्रुधुरासारखी रसायने दंगलखोरांवर नियंत्रणासाठी वापरली जातात. अमेरिकेने व्हिएतनाम युद्धात वापरलेल्या ‘एजंट ऑरेंज’सारख्या रसायनांनी झाडांची पाने गळून पडतात. त्यांना डीफॉलिएंट म्हणतात. शत्रूची उभी पिके नष्ट करण्यासाठी हर्बीसाइड्स वापरली जातात.

सचिन दिवाण

sachin.diwan@expressindia.com